लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : जिल्ह्यात मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे ८४ लाखहून अधिक नोंदींची तपासणी झाली असून यात एक लाख ४३ हजार ९५६ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. संबंधित कुणबी नोंदींच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन जतन करण्यात येणार आहे.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या धर्तीवर सरकारच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया जिल्ह्यात राबवली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. विविध शासकीय विभागातील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी सुरू आहे. दस्तावेज खोलीतील प्रत्येक सरकारी दस्तावेज तपासला जात आहे. अन्य सरकारी विभाग पडताळणी करत आहेत.
आणखी वाचा-“भुजबळ किती जणांना पाडेल, माहीत आहे का ?”, छगन भुजबळ यांचा इशारा
गाव पातळीपासून ते महापालिका स्तरावर नोंदींची पडताळणी सुरू आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत सुमारे ८४ लाख नोंदींची पडताळणी करण्यात आली. यात पाहणी पत्रक, खासरा पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय नोंदणी पुस्तक सन १९५१, अनुमान नंबर १ व २ हक्क नोंद पत्रक, सातबारा उतारा, जन्म-मृत्यू नोंदणी पुस्तक, ताडी व मळी नोंदवही, खरेदीखत, बटाई खत, सेवा पुस्तिका, सेवा अभिलेखे, सैन्य भरतीवेळीच्या नोंदी आदी कागदपत्रांची छाननी प्रगतीपथावर आहे.
दोन टप्प्यात तपासणी
विविध शासकीय विभागांच्या पडताळणीत १९४८ पूर्वीच्या आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील नोंदींची तपासणी केली जात आहे. १९४८ पूर्वीच्या ३७ लाख ६३ हजार ८५ नोंदींची तपासणी केली गेली. यातील एक लाख १२ हजार ४८९ नोंदींमध्ये कुणबीचा उल्लेख आढळला. १९४८ ते १९६७ या काळातील ४६ लाख एक हजार ७७१ नोंदीच्या पडताळणीत ३१ हजार ४६७ कुणबी नोंदी आढळल्या. अशा प्रकारे जिल्ह्यात एक लाख ४३ हजार ९५६ कुणबी नोंदी सापडल्याची माहिती प्रशासनाने दिली. संबंधित कुणबी नोंदींच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन जतन करण्यात येणार आहे.