नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लाच घेतांना अटक होवून २४ तासही उलटत नाही तोच आरटीओच्या नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एका खासगी व्यक्तीला ५० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे या व्यक्तीला नेमके पाठबळ कोणाचे आणि हा कोणासाठी लाचेची मागणी करत होता, याची चौकशी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील लाचखोरी हा सर्वश्रृत चर्चेचा विषय आहे. याआधीही या नाक्यावर अनेक अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास खासगी व्यक्ती इर्साल पठाण याने गुजरातमधून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी नाक्यावर मालवाहू वाहन चालकाकडे ५० रुपयांची मागणी केली. सदर रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असताना त्याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत असून याबाबत शासकीय यंत्रणा मौन बाळगून आहे.

हेही वाचा…जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून पाच प्रवासी गंभीर; मंत्री गुलाबराव पाटील यांचे मदतकार्य

प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीतील तपासणी नाक्यावर खासगी व्यक्ती उघडपणे कोणासाठी पैसे उकळत होता, याची उकल झालेली नाही. या नाक्यावर २२ ते २३ अधिकारी नियुक्त आहेत. विभागातील काही बड्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय शासनाच्या तपासणी नाक्यावर खासगी व्यक्तीकडून वसुली शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईत तपासणी नाक्यावरील दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा…स्वाईन फ्लू आजाराने मालेगावात निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

परंतु, त्यांचा संबंध दिसून आला नसल्याने चौकशी करुन दोन दिवसांनी हजर राहण्याची समज देत त्यांना सोडून देण्यात आले. या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या गाडीसमोरच चोर चोर अशी घोषणाबाजी देखील केली होती. नंदुरबारचे सीमा तपासणी नाके मुळातच वादाचे केंद्र आहेत. लगतच्या गुजरात प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्व सीमा तपासणी नाके बंद करण्या आले असताना अवैध वसुलीला खतपाणी घालणाऱ्या या तपासणी नाक्यांकडे सोईस्कर डोळेझाक कशी, असा प्रश्न नवीन सापळ्यावरुन पुन्हा पुढे येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second bribery arrest in nandurbar raises questions about systemic corruption psg
Show comments