रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची दुसरी चाचणी नकारात्मक
मालेगाव : प्रशासकीय गलथानपणाचा फटका सहन केल्यानंतर सुखद धक्का बसण्याची प्रचिती शहराला लागून असलेल्या सवंदगाव येथील गावकऱ्यांना आली आहे.
२७ एप्रिल रोजी शहरातील ३६ जण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालात नीट पत्ता नसल्याने एका बाधित रुग्णाचा ठावठिकाणा लागत नव्हता. अथक प्रयत्नानंतर आठ दिवसांनी हा शोध संवदगावच्या या तरुणाजवळ येऊन थांबला. करोनाबाधित अहवाल आलेल्या एका तरुणाचा तब्बल आठ दिवसांनी अचानक ठावठिकाणा लागला. धावपळ करत गावात दाखल झालेल्या आरोग्य पथकाद्वारे या तरुणाला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विलगीकरण आणि करोना चाचणीसाठी रुग्णवाहिकेतून मालेगावला हलविण्यात आले. दरम्यान करोनाबाधित म्हणून सांगितला गेलेला तरुण आणि त्याच्या कुटुंबातील लोकांशी आठ, दहा दिवसांत काहींचा संपर्क आल्याने संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली. करोना संसर्गाची गावावर जणू टांगती तलवार असल्याची एकंदर स्थिती. मात्र या तरुणाच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे चाचणी अहवाल नकारात्मक आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बरे वाटत नसल्याने गावातील ३० वर्षांचा तरुण मालेगावातील एका खासगी रुग्णालयात गेला होता. तेथील डॉक्टरांच्या सल्लय़ानुसार २४ एप्रिल रोजी तो मन्सुरा रुग्णालयात गेला. तेथे त्याचा नमुना घेतल्यावर रुग्णालय व्यवस्थापनाने त्याला घरी पाठवले. त्यानंतर त्याला काही त्रास नव्हता. चाचणी अहवालासंदर्भात कोणी काही कळवलेही नसल्याने आपला अहवाल नकारात्मक असेल अशीच त्याची खात्री झाली. परंतु, पाच एप्रिल रोजी भल्या सकाळी आलेल्या आरोग्य पथकाने तो करोनाबाधित असल्याचे सांगत त्याला तसेच त्याच्या कुटुंबातील अन्य चार जणांना मालेगावला नेले. सर्वाचे नमुने घेतले. त्यानंतर या तरुणाला दाभाडी येथील विलगीकरण कक्षात, तर अन्य चौघांना गावातच अलगीकरणात ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी या सर्वाचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व नकारात्मक असल्याचे उघड झाले. या तरुणाच्या करोना तपासणीबद्दल गावकरी अनभिज्ञ होते. काही जणांशी त्याचा आणि कुटुंबियांचा संपर्कही आला असल्याने तो बाधित असल्याचे समजल्यावर गावात भीतीचे सावट पसरले. दोन दिवस गावकरी दडपणाखाली वावरत होते. परंतु, या तरुणाच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचा तसेच त्याच्या कुटुंबातील सर्वाचा अहवाल नकारात्मक आल्याने ग्रामस्थांना हायसे वाटले आहे.