जळगाव : जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १५ दिवसांपूर्वी एक महिला गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झाल्याने दाखल झाली होती. त्यानंतर आता रावेर तालुक्यातील २२ वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण झाली असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जीबीएस रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढू लागली असताना पुण्यानंतर मुंबईत रुग्णांचा मृत्यू झाल्याने या आजाराविषयी चिंता वाढू लागली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील तरूण कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेला होता. त्याठिकाणावरून घरी परतल्यावर त्याला अशक्तपणासह अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. बऱ्हाणपुरातील एका खासगी रुग्णालयात तपासणी केल्यावर त्यास जीबीएससदृश्य आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तरूणास एखाद्या न्यूरोलॉजिस्टकडे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र, प्रशासनाला त्याची माहिती समजताच तातडीने संपर्क साधून त्यास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील जीबीएस रुग्णांसाठी तयार केलेल्या स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर आता नियमित उपचार सुरू असून, तब्बेत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, अंगदुखीसह अशक्तपणाची लक्षणे दिसून आल्यास परस्पर उपचार न घेता थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.