पालिका आरोग्य समितीच्या बैठकीत गदारोळ
घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा साचणारी ठिकाणे अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ची संख्या कमी होत नाही. मोकळ्या जागेतील पालापाचोळा गोळा करण्यासाठी घंटागाडय़ांची संख्या वाढविली जात नसल्याच्या तक्रारी खुद्द पालिका अधिकाऱ्यांनी मांडून घंटागाडी व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. यामुळे महापालिका आरोग्य समितीच्या बैठकीत चांगलाच गदारोळ झाला. सदस्यांनी घंटागाडीच्या कारभारावर आक्षेप घेऊन ताशेरे ओढले.
सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आरोग्य समितीची बैठक झाली. स्वच्छतेच्या मुद्दय़ावरून बराच गोंधळ उडाला. सिडकोसह काही भागातील कचरा साचणारी ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) कमी होत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला. अनेक भागात कचरा साचलेला दिसतो. कचरा, अस्वच्छता यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. घंटागाडय़ा कचरा उचलत नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यास पालिका अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. नियमितपणे कचरा उचलला गेल्यास कुणीही त्या ठिकाणी कचरा टाकणार नाही. परंतु, कचरा उचलला जात नसल्याने ब्लॅक स्पॉटची संख्या कमी करता येत नसल्याचा मुद्दा मांडला गेला. मोकळ्या जागा, भूखंडावरील पालापाचोळा उचलण्यासाठी जादा घंटागाडय़ा उपलब्ध करण्याचे ठरले होते. परंतु, ठेकेदाराने अद्याप त्या उपलब्ध करून दिल्या नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. पंचवटी विभागातील अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिल्यावर सदस्य आक्रमक झाले. विविध त्रुटींवरून घंटागाडी ठेकेदाराला पालिकेने अडीच कोटी रुपये दंड केला आहे. इतका दंड भरूनही ठेकेदाराला ती चालविणे कसे परवडते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. घंटागाडी ठेकेदाराशी तीन वर्षांचा करार झाला आहे. आवश्यकतेनुसार गाडय़ा उपलब्ध करण्याची त्याची जबाबदारी असल्याचे सभापतींनी सूचित केले. नालेसफाईची कामे रखडलेली आहेत. त्याची जबाबदारी आरोग्य विभागावर टाकली गेली. या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ती कामे कशी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला. या कामात विभागीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे सांगण्यात आले. औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. या संदर्भात संबंधित विभागांशी पत्र व्यवहार केला गेल्याचे प्रशासनाने सांगितले. आरोग्य समितीचे पदाधिकारी शनिवारी औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार आहेत.
दीपदानासाठी गोदावरी पात्रात खास व्यवस्था
गोदावरी प्रदूषणाचा विषय सातत्याने चर्चेत आहे. गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी विविध उपाय केले जात आहेत. त्या अंतर्गत पाण्यात सोडल्या जाणाऱ्या दीपदानासाठी आता पात्रातच विशिष्ट व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून सोडले जाणारे दिवे पुन्हा पात्रातून बाहेर काढता येतील. रामकुंड परिसरात नदीत १५ बाय १९ फूट आकाराचे फायबर किंवा जाळीचा भाग तयार केला जाईल. पाण्यात सोडलेले दिवे या ठिकाणीच राहतील. नियमितपणे ते बाहेर काढून नदी स्वच्छ राखता येईल. गोदावरी प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून न्यायालयाने महापालिकेला आजवर अनेक निर्देश दिले आहेत. गोदावरी प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी स्वच्छतेचे काम हाती घेतले गेले. ही प्रक्रिया नियमित नसल्याने गोदावरीची अवस्था बिकट झाल्याचा गोदाप्रेमींचा आक्षेप आहे. निर्माल्य संकलनासाठी पात्रालगत आधीच ठिकठिकाणी कलश ठेवण्यात आले आहेत. पात्रात सोडल्या जाणाऱ्या दिव्यांसाठी ही व्यवस्था प्रत्यक्षात आल्यास प्रदूषणावर काही अंशी नियंत्रण येईल, असे आरोग्य समितीला वाटते.