नाशिक – राज्यात ज्या नेत्यांना आणि आमदारांना सुरक्षेची आवश्यकता आहे, त्यांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. ज्यांना सुरक्षेची गरज नव्हती, त्यांना ती दिली गेली नाही. या विषयात गहजब करण्यासारखे काही नाही, असे शिक्षणमंत्री तथा शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी सांगितले.

शिवजयंतीनिमित्त बुधवारी येथे आयोजित जय शिवाजी-जय भारत पदयात्रेत शिक्षणमंत्री भुसे सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गृह विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा नुकताच आढावा घेत माजी मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेत कपातीचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांना बसला. यातील काही जणांनी नाराजी व्यक्त केली असताना शिंदे गटातील मंत्र्यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणाचा संदर्भ देत आवश्यकतेनुसार नेत्यांना सुरक्षा देण्यात आल्याकडे भुसे यांनी लक्ष वेधले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे बंधू षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत असल्याविषयीच्या प्रश्नावर भुसे यांनी तीन पातळ्यांवर उपरोक्त प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. काही संशयित कारागृहात असून चौकशीतून वस्तूस्थिती पुढे येईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

कमाल खानवर कठोर कारवाई होणार छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या अभिनेता कमाल खानवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असताना अभिनेता कमाल खानने समाजमाध्यमातून वादग्रस्त माहिती प्रसारित केली. हे अतिशय खेदजनक असून अशा प्रवृत्ती ठेचून काढण्याची आवश्यकता असल्याचे भुसे यांनी नमूद केले. ज्या महान व्यक्तींनी आयुष्याची होळी करून बलिदान दिले, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर बोलणाऱ्यांच्या बुद्धिची कीव करावीशी वाटते, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader