आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
नाशिक – आरोग्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वतःतील संवेदनशीलता कायम ठेवत भावी डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यातील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्यात येणार असून या ठिकाणीही किमान महिन्यातून एक दिवस या डॉक्टरांनी सामान्य आणि गरजू रुग्णांना सेवा द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर, कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्णन यांनी, स्नातकांनी स्वतंत्रपणे वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर रुग्णांना चांगली वागणूक द्यावी, आपल्या प्रत्येक कृतीत आणि उपचारावेळी मानवी संवेदना हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आरोग्य सेवा क्षेत्रात संधी वाढत आहेत. या संधीचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. आरोग्य क्षेत्रात काम करताना मानसिक कणखरता महत्त्वाची असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले. मंत्री मुश्रीफ यांनी, राज्यात एमबीबीएससाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने ९०० जास्त जागांना मान्यता दिली असल्याचे सांगितले.
विद्यापीठातील नवनवीन उपक्रमांना राज्य शासनाचे पाठबळ मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष गंगाधर यांनी, पारंपरिक पद्धतीसह नव्या तंत्रज्ञानांचा उपयोग विद्यापीठ करत असून विविध संस्था आणि शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठ राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
१११ विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकाने गौरव
राज्यपाल तथा कुलपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते १५ विद्यार्थ्यांना पीएच. डी. ने गौरविण्यात आले. विविध विद्याशाखेतील १११ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर, अभ्यासक्रमाच्या आणि आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या आठ हजार ५४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते ‘ब्लू प्रिंट ऑफ नर्सिंग’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.