नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघांमध्ये झालेली बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. महायुतीतील नाराजांची समजूत काढण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. दिवसभर त्यांनी बंडखोरांशी चर्चा करुन माघारीसाठी प्रयत्न केले. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांनी संपर्क साधूनही डॉ. हेमलता पाटील उमेदवारीवर ठाम आहेत. इगतपुरी मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) माजी आमदार निर्मला गावित यांनीही माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात ३३७ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्यामुळे बहुरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. महायुतीत स्वकीय आणि मित्रपक्षांचे बंडखोर अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरणार आहेत. देवळालीत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) राजश्री अहिरराव आणि दिंडोरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी आमदार धनराज महाले यांनी अखेरच्या क्षणी अधिकृत एबी अर्ज जोडून बंडखोरीचे निशाण फडकावले. मित्रपक्षाने केलेल्या बंडखोरीबाबत उमेदवारांनी अजित पवार यांना कल्पना दिली. तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते यासंदर्भात चर्चा करतील, असे अजित पवार गोटातून सांगण्यात आले.
हेही वाचा…लाखोंचा खाद्यतेल, मसाला साठा जप्त
u
महायुतीतील बंडखोरीची गांभिर्याने दखल भाजपने घेतली आहे. नांदगावमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ हे (अपक्ष) मैदानात आहेत. चांदवड मतदारसंघात भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात त्यांचे बंधू भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर रिंगणात आहेत.
इगतपुरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार हिरामण खोसकर याच्या विरोधात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी आमदार काशिनाथ मेंगाळ अपक्ष रिंगणात आहेत. बंडखोरीचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी गिरीश महाजन यांनी दिवसभर ग्रामीण भागात ठाण मांडून बंडखोरांशी चर्चा करून समजूत काढण्याचे प्रयत्न केले. याबाबतची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी दिली. सर्वांशी बोलणी सुरू असून शेवटच्या दिवसापर्यंत माघारीसाठी प्रयत्न केले जातील, असे सावजी यांनी सांगितले.
हेही वाचा…दिवाळीमुळे फुलांच्या दरात वाढ
हेमलता पाटील, निर्मला गावित ठाम
नाशिक मध्यमध्ये काँग्रेसच्या बंडखोर डॉ. हेमलता पाटील यांच्याशी प्रभारी रमेश चेनिथला यांनी संपर्क साधून माघार घेण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी ती नाकारत निवडणूक लढविण्याची ठाम भूमिका स्वीकारली आहे. तशीच स्थिती इगतपुरी मतदारसंघात आहे. इगतपुरीत काँग्रेस उमेदवार लकी जाधव यांच्या विरोधात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) माजी आमदार निर्मला गावित अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. माघारीसाठी नेत्यांनी अद्याप संपर्क साधला नाही. परंतु, कोणीही मनधरणी केली तरी आपण निवडणूक लढविणार असल्याचे गावित यांनी स्पष्ट केले. चार नोव्हेंबर ही माघारीची मुदत आहे. बंडखोरांना अन्य ठिकाणी संधी देण्याचे आश्वासन देत संबंधितांनी शक्य तितक्या लवकर माघार घ्यावी म्हणून धडपड सुरू आहे.