स्टेट इनोव्हेशन कौन्सिल आणि जिल्हा नियोजन समिती यांच्यातर्फे २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नावीन्यता दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबड येथील नाशिक इंजिनीअर क्लस्टर येथे होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्याचा सर्वागीण विकास घडवून आणण्यासाठी नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करणे, जिल्हा स्तरावरील सर्व विभागांमध्ये समन्वय साधत विविध विषयांवर चर्चा करत कृती आराखडय़ानुसार काम करण्यासाठी नावीन्यता परिषद गठित करण्यात आली आहे. समितीच्यावतीने जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी नावीन्यता दिवस साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात नावीन्यता परिषद होणार आहे. त्यात आरोग्य, प्राथमिक शिक्षण, स्वच्छता, लघुउद्योग, कृषी व फलोत्पादन, स्वच्छ पाणीपुरवठा आणि प्रशासनासमोरील आव्हाने आदी विषयांवर त्या त्या विषयातील नामवंतांशी नवोदितांची चर्चा घडवून त्यातील आव्हाने, उपाययोजना आदींचा ऊहापोह केला जाणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहणार आहेत. तसेच शालेय, महाविद्यालयीन, उद्योग क्षेत्र या तिन्ही स्तरावरील नवनवीन कल्पना, प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यातील सवरेत्कृष्ट तीन प्रकल्पांना गटनिहाय पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय २३ ते ३० जानेवारी कालावधीत एमआयटी मीडिया लॅब आणि टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस यांच्या माध्यमातून आणि कुंभथॉन, नाशिक जिल्हा नावीन्यता परिषद आणि महानगरपालिका यांच्या सहकार्याने ‘इनोव्हॅशन कॅम्प’ भरविण्यात येणार आहे. त्यात देशभरातून निवड केलेल्या १५० विद्यार्थ्यांना नवकल्पनांचा शोध कसा घेतला जातो यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच निवडक विद्यार्थ्यांना सहा महिन्यांकरिता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ०२५३-२५७३०२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीने केले आहे. या उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Story img Loader