नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबनही झालं. मात्र, आता सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. “बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले,” असा आरोप सत्यजीत तांबेंनी केला. ते शनिवारी (४ फेब्रुवारी) नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सत्यजीत तांबे म्हणाले, “मी एक दोन पत्रकार परिषदेत ऐकलं की नाशिक पदवीधर मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय तांबे कुटुंबाला घ्यायचा होता. मग बरोबर १२.३० वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर झाली? माझे वडील सांगत आहेत की, मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला उभं करायचं आहे, तर मग माझ्या वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली.”
“मग एकच उमेदवारी दिल्लीतून जाहीर का झाली?”
“महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीतील एकाही जागेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावती, नागपूरमधील उमेदवारांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग एकच उमेदवारी दिल्लीतून जाहीर का झाली? हे सर्व एका षडयंत्राचा भाग आहे,” असा गंभीर आरोप सत्यजीत तांबेंनी केला.
हेही वाचा : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”
“ही ‘स्क्रिप्टेड स्टोरी’ होती. हे षडयंत्र बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजीत तांबेला उमेदवारी मिळू नये आणि आमच्या कुटुंबाला पक्षाबाहेर ढकलण्यासाठी रचलं गेलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही,” असंही सत्यजीत तांबेंनी नमूद केलं.
“मी काँग्रेसचा उमेदवार, हे माझं पहिलं वाक्य होतं”
सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हटलं होतं की, मी काँग्रेसचा उमेदवार आहे. हे माझं पहिलं वाक्य होतं. माझ्या वडिलांनी तर आम्ही महाविकासआघाडीचे आहोत, असाही शब्दही वापरला होता. तसेच अपक्ष असल्याने सर्वच पक्षांनी माझ्या पाठिशी उभं राहावं, अशी भूमिका मी घेतली.”
“मला भाजपात ढकलण्याचंच काम झालं”
“मी सगळ्याच पक्षांकडे पाठिंबा मागायला जाणार आहे आणि त्यात भाजपाचंही नाव घेतलं. परंतू, मी भाजपाचा पाठिंबा घेणार अशी बातमी चालवण्यात आली. पक्षांतर्गत ही स्क्रिप्ट आधीच तयार झाली होती. त्याला बळ देण्याचं काम काही लोकांनी केलं. मला भाजपात ढकलण्याचंच काम झालं. हे अर्धसत्य मागील २५ दिवसांपासून सुरू होतं. त्यामुळे हे खरंखरं सांगण्यासाठी मी पुढे आलो,” असं सत्यजीत तांबेंनी सांगितलं.