नाशिक: नांदुर शिंगोटे गावात ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या दरोडा प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी, मोटारसायकल असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
या बाबतची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे नांदुर शिंगोटे गावात संतोष कांगणे आणि रमेश शेळके यांच्या घरात सहा जणांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला होता. लोखंडी पहार, चाकुचा धाक दाखवत मारहाण करीत टोळीने १३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, पावणेतीन लाख रुपये असा सहा लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा तसेच वावी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळावरून सीसीटीव्ही चित्रणावरून संशयितांचे कपडे व गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून तपासासाठी पथके रवाना केली होती. त्या अंतर्गत रवींद्र गोधडे (१९, राजदेरवाडी, चांदवड), सोमनाथ पिंपळे (२०, मनमाड फाटा, लासलगाव), करण पवार (१९, इंदिरानगर, लासलगाव), दीपक जाधव (चंडिकापूर, वणी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी साथीदारांच्या मदतीने नांदुरशिंगोटे येथील दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस पथकाने सुदाम पिंगळे (राजदेरवाडी, चांदवड), बाळा पिंपळे (गुरेवाडी, सिन्नर) व करण उर्फ दादू पिंपळे (गुरेवाडी) यांनाही अटक करण्यात आली. या तिघांना पकडण्यासाठी पोलीस पथकाने सोलापूर तालुक्यातील बाभूळगाव परिसरात दोन दिवस वेषांतर करून नजर ठेवली. मध्यरात्री सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. संशयितांच्या ताब्यातून उपरोक्त गुन्ह्यात चोरलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ भ्रमणध्वनी, पाच दुचाकी असा नऊ लाख दोन हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक उमाप यांनी सांगितले.
हेही वाचा >>> त्यांना मंत्रिपदापेक्षा दूध संघ महत्त्वाचा : एकनाथ खडसे
या कारवाईने नांदुर शिंगोटे परिसरातील दरोडे व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. दरोड्याच्या घटनेनंतर अधीक्षक उमाप आणि अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांना पकडण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, सागर शिंपी, मयूर भामरे आणि वावी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ही कामगिरी केली. याबद्दल उमाप यांनी तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
गावातील मोठ्या घराचा शोध
या कारवाईने दरोड्याचे दोन, घरफोडीचा एक आणि मोटारसायकल चोरीचे तीन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. टोळीचे सदस्य गावातील मोठ्या घरांची आधी माहिती घेत असत. नंतर त्या घरावर दरोडा टाकताना आसपासच्या घरांमधून जे मिळेल ते लंपास करण्याची त्यांची कार्यपध्दती होती, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.