नाशिक शहरातील रिंग रोडवरील अजय कॉलनीत राहणारे वाहन क्षेत्रातील व्यावसायिक प्रा. डी. डी. बच्छाव आणि किरण बच्छाव यांच्या निवासस्थानी दरोडा प्रकरणी सात संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले. हॉटेल व्यवसायात कर्जबाजारी झाल्याने मित्रांसोबत योजना आखत दरोडा टाकल्याची कबुली मुख्य सूत्रधार अनिल ऊर्फ बंडा कोळी (३२, रा. विदगाव) याने पोलिसांना दिली. न्यायालयाने सर्व संशयितांना २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- नाशिक जिल्ह्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बच्छाव यांच्या निवासस्थानी १४ नोव्हेंबरला रात्री दरोडा पडला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता काही तरुण सलग पाच दिवस बच्छाव यांच्या निवासस्थानावर नजर ठेवत असल्याचे दिसले. वेगवेगळ्या पथकांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास केला. दरोडेखोर हे सराईत नसून स्थानिक असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तांत्रिक मुद्यांच्या आधारावर शुक्रवारी रात्री अनिल ऊर्फ बंडा कोळी, करण सोनवणे (१९), यश ऊर्फ गुलाब कोळी (२१), दर्शन सोनवणे (२९), अर्जुन कोळी- पाटील (३१), सचिन सोनवणे (२५), सागर कोळी (२८, सर्व रा. विदगाव) यांना अटक केली. पथकाने शुक्रवारी रात्री विदगाव येथून काहींना, तर आव्हाणे, जैनाबाद परिसरातून इतरांना अटक केली.
हेही वाचा- नाशकातील गोदावरी नदीवर दररोज निनादणार महाआरतीचे सूर, पाच कोटींचा निधी मंजूर
टोळीतील मुख्य सूत्रधार अनिल ऊर्फ बंडा कोळी हा हॉटेल व्यावसायिक आहे. व्यवसायात कर्जाचा बोजा वाढला होता. वर्षभरापूर्वी तो बच्छाव यांच्या मोटारींच्या शोरूममध्ये आला होता. तेव्हा बॅगमध्ये पैसे ठेवताना त्याने पाहिले होते. काही महिन्यांपूर्वी भरपूर कर्ज झाल्यामुळे त्याने त्याच्या मित्रांसह दरोड्याची योजना आखली. दरोड्यात चांगली रक्कम मिळेल, असे आमिष मित्रांना दाखविले. योजना तयार झाल्यानंतर दरोडेखोरांनी बच्छाव यांच्या निवासस्थानावर पाळत ठेवली. ११ नोव्हेंबरपासून त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी ठरले. सलग दोन ते तीन दिवस एकाने बच्छाव यांच्या निवासस्थानाजवळ पाळत ठेवली. १४ नोव्हेंबर रोजी दरोडा टाकला.