पहिल्या टप्प्यात आठ शहरांमध्ये ५० केंद्रांची उभारणी

महानगरपालिकेने शहर बस सेवा कार्यान्वित करताना निम्म्या बस इलेक्ट्रिकच्या ठेवण्याचा पर्याय निवडला आहे. ‘महावितरण’ने विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिग केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली असून पहिल्या टप्प्यात आठ शहरांमध्ये ५० केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. यात नाशिकमधील सात केंद्रांचा समावेश असून  शहर आणि मुंबई-आग्रा महामार्गावर ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

विद्युत वाहनांचा वापर वाढल्यास एका वाहनाद्वारे दरवर्षी ४.६ मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते. केंद्र सरकारने राष्ट्रीय दळणवळण मोहीम २०२० धोरण जाहीर केले आहे. त्याच अनुषंगाने राज्यातही स्वतंत्र महाराष्ट्र

विद्युत वाहन प्रोत्साहन धोरण तयार करण्यात आले आहे. सध्या पेट्रोल, डिझेल वाहनांची संख्या लाखोंच्या घरात असली तरी भविष्यात विद्युत वाहनांचा अधिक्याने वापर क्रमप्राप्त ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात ५० चार्जिग केंद्र उभारून पुढील टप्प्यात संपूर्ण राज्यात ५०० केंद्र उभारण्याची ‘महावितरण’ची योजना आहे. नाशिकमधील केंद्रांसाठी १४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांचे जलद चार्जिग करता यावे म्हणून ‘महावितरण’ विशिष्ट स्वरूपाचे तंत्रज्ञान वापरणार आहे. या केद्रांचा सुलभपणे लाभ घेता यावा म्हणून ‘महावितरण’च्या अ‍ॅपमध्ये ग्राहकाला ग्राहक क्रमांक आणि विद्युत वाहन क्रमांक नोंदणी करण्याची सुविधा दिली जाणार आहे.

सहा रुपये युनिट दराने चार्जिग

विद्युत वाहन चार्जिग करण्यासाठी प्रति युनिट सहा रुपये मूल्य आकारण्यात येणार आहे. दिवसा चार्जिग करण्यासाठी हा दर राहील. रात्री १० ते सकाळी सात या कालावधीत वाहन चार्जिग करणाऱ्यांना वीज दरात दीड रुपया सवलत देण्यात येणार आहे.

Story img Loader