जळगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील सात तरुणांची २० लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाचोरा येथील पोलीस ठाण्यात संशयित प्रकाश सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहटार येथे मोहन चौधरी हे पत्नी छाया चौधरी, मुलगा सूरज चौधरी, सून भाग्यश्री चौधरी यांच्यासह एकत्र कुटुंबात राहतात. ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भुसावळ येथील प्रकाश सोनवणे याच्याशी त्याचा नातेवाईक हिलाल गायकवाड यांच्या मध्यस्थीने चौधरी कुटुंबाची ओळख झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनवणे भुसावळ येथे रेल्वेत नोकरीस आहे. त्याने मोहन चौधरी आणि लोहटार गावातील इतर सहा लोकांना विश्‍वासात घेऊन, आपली रेल्वेतील मोठ्या अधिकार्‍यांशी ओळख असून त्यांच्यामार्फत रेल्वेत नोकरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. फेब्रुवारी २०१४ मध्ये सोनवणेने मोहन चौधरी यांचा मुलगा सूरज याला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत तीन लाख रुपये घेतले होते. तसेच त्याने गावातील मोतीलाल चौधरी, राजाराम पाटील, आत्माराम चौधरी, नीलेश चौधरी, रावसाहेब पाटील आणि पंकज पाटील यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले. मात्र, त्याने मुलांना आजपर्यंत रेल्वे विभागात नोकरी लावली नाही. पैसेही परत केले नाहीत. मोहन चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सोनवणेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven youths cheated with the lure of railway jobs crime against one of bhusawal ysh
Show comments