नाशिक – नाशिक महानगरपालिका आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग यांच्यात लिंगोत्तर प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले असून ही चिंताजनक बाब आहे. छुप्या पध्दतीने लिंग चाचणी शहर परिसरात होत असल्याची साशंकता गर्भलिंग निदान अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, मालेगाव महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, ॲड. सुवर्णा शेपाळ आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची दर ९० दिवसांनी नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. तपासणी करताना सदर केंद्रांचे लेखापरीक्षण करावे, तसेच कायद्याची माहिती आणि जनजागृतीसाठी अभियान राबबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ॲड. शेपाळ यांनी गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायद्यांतर्गत जिल्ह्यातील कामकाज व केलेल्या कारवाईसंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती दिली. नाशिक महानगरपालिका हद्दीत मागील वर्षी हे प्रमाण ९१४ इतके होते. यावर्षी ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण ८८९ इतके होते. मुलींचे प्रमाण कमी झाले असून शहर परिसरात छुप्या पध्दतीने लिंग चाचणी होत असल्याचा संशय बैठकीत व्यक्त करण्यात आला. नाशिक ग्रामीणमध्ये हे प्रमाण ९३४ इतके आहे. मालेगाव महापालिका हद्दीत आशादायी चित्र असून ९७२ हे मुलींचे प्रमाण असून मागील वर्षाच्या तुलनेत ते वाढले आहे.
हेही वाचा >>> गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
दरम्यान, लिंगोत्तर प्रमाणाची चर्चा होत असताना शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आमची मुलगी या संकेतस्थळावर नाशिक शहर परिसरातून एकही तक्रार नसून ग्रामीणमध्ये पाच तक्रारी प्राप्त झाल्या. सोनोग्राफी केंद्रावर गुणवत्तापूर्ण तपासणी करण्यासह कागदपत्रांची पूर्तता वेळीच करण्यात यावी, आदी सूचना करण्यात आल्या. सरकारी योजना जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि गर्भलिंग निदानाविषयी प्रबोधन करा, असे आवाहन शर्मा यांनी केले.
खबरी योजनाविषयी अनभिज्ञता
शासनाच्या वतीने गर्भलिंग निदान होत असलेल्या आरोग्य केंद्राची माहिती कोणी दिली, त्याची खातरजमा केली असता ही माहिती खरी आढळली. यानंतर संबंधितावर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. खबरीला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. ही योजना सर्वांना लागु आहे. राज्यात अनेक ठिकाणी योजनेचे लाभार्थी असताना नाशिकने अद्याप भोपळा फोडलेला नाही. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार करण्याची सुविधा
नाशिक, मालेगाव शहर तसेच ग्रामीण भागात जर कुठल्याही सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी आमची मुलगी या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव त्याची इच्छा असल्यास गोपनीय ठेवता येते. तसेच १८००२३३४४७५ किंवा १०४ या क्रमांकावरही तक्रार करता येते.