लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: संपूर्ण महाराष्ट्रात चार दशकांपासून शाहिरीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे ज्येष्ठ शाहीर समाजभूषण शिवाजीराव पाटील यांचे २०२१ मध्ये अतिवृष्टीत राहते घर पडले. तेव्हापासून ते भाड्याच्या घरात राहत असून, तीन वर्षांपासून घरासाठी प्रशासनाकडे चपला झिजवीत आहेत. अजूनही प्रशासनासह शासनाने त्यांच्या टाहोकडे लक्ष दिले नाही. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप शाहीर पाटील यांनी केला आहे.
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील खानदेश लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शाहीर परिषदेचे राज्य संघटनप्रमुख शिवाजीराव पाटील यांचे घर पडल्यावर महाराष्ट्रातील काही लोककलावंतांनी थोडेफार अर्थसहाय्य करून पाटील यांना तात्पुरता मदतीचा हात दिला होता. आमदार किशोर पाटील यांनी शाहिरांना तालुक्यातील कलावंत या नात्याने सहकार्य केले, मंगेश चव्हाण आणि सुरेश भोळे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही लोकप्रतिनिधीने पाटील यांना मदत केली नाही. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शाहिरांच्या मदतीकडे दुर्लक्ष केले, याची खंत शाहीर पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा… नंदुरबार जिल्ह्यात वादळामुळे दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी मदतीचे ठोस आश्वासन दिले. मात्र, तेदेखील हवेत विरले. त्यानंतर शाहीर पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा अर्ज दिला. सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांच्याकडेही अर्ज दिला. मात्र, केवळ कागदपत्री आश्वासने देऊन कलावंतांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे. सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. शाहीर पाटील यांना मंत्री मुनगंटीवार यांनी नवीन घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्याबद्दलचे जिल्हाधिकार्यांच्या नावाने पत्र दिले. प्रत्यक्ष तत्कालीन प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना मुंबईतून भ्रमणध्वनीवरून संपर्कही केला.
हेही वाचा… नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित
शाहीर पाटील यांनी ते पत्र जिल्हाधिकार्यांना दोन ते तीन वेळा दिले. जिल्हाधिकार्यांमार्फत संबंधित पत्र तहसीलदारांकडे आले. तेथेसुद्धा शाहीर पाटील यांच्या पदरी निराशा पडली. प्रशासनाचे म्हणणे आहे की, अशी कोणतीही मदतीची तरतूद आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड संताप व्यक्त केला असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. करोनाकाळात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रघुवीर खेडकर यांना भरघोस मदत दिली. मात्र, स्थानिक जिल्ह्यातील कलावंतांच्या दुरवस्थेकडे पालकमंत्र्यांचे लक्ष नाही.
हेही वाचा… नाशिकसह खानदेशात वादळी वाऱ्याचा कहर; अनेक वृक्ष कोसळले, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट
कलावंतांच्या हितासाठी झटणारे पालकमंत्री स्थानिक कलावंतांना सहकार्य करू शकत नाहीत, अशी खंत शाहीर पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यात दोन मंत्री असूनही दोन वर्षांत केवळ पत्राने भुलवून मदतीपासून वंचित ठेवले आहे. पाटील यांचे वय आज सत्तरीकडे असून, गेल्या वर्षभरापासून ते नगरदेवळा येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. गावातील एका कलावंताने पाटील यांना अल्प दरात ८०० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या जागेच्या बांधकामासाठी लागणारा खर्च कसा आणि कुठून उपलब्ध करावा, असा प्रश्न शाहीर पाटील यांच्यासमोर आहे.