सुमारे सव्वा दोनशे वर्षांपासून आणि नुकत्याच संपलेल्या सिंहस्थ पर्वाच्या तेरा महिन्यांत प्रयत्न करूनही जे प्रत्यक्षात आले नाही, त्या वैष्णव आणि शैव पंथीयांमधील वादाचे निराकरण त्र्यंबक येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या काही मिनिटांच्या बैठकीत झाले, असे मानणे धारिष्टय़ाचे ठरणार आहे. सिंहस्थ पर्वाच्या सांगता प्रसंगी दोन्ही पंथीय साधू-महंतांनी एकत्रित नांदण्याच्या आणाभाका घेतल्या. उभयतांमधील वाद संपुष्टात आल्याचे सांगण्यात आले. सिंहस्थ पर्व समाप्त होत असताना इतक्या सामंजस्याने हा प्रश्न मिटल्याने समस्त भक्तगण आणि दोन्ही पंथीयांना सांभाळताना नाकीनऊ आलेल्या प्रशासकीय यंत्रणांनाही हायसे वाटले. तथापि, पुढील बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यापर्यंत संबंधित साधू-महंत याच भूमिकेवर ठाम राहतील का, हा खरा प्रश्न आहे. सिंहस्थाच्या तेरा महिन्यांतील ताजा इतिहास पाहिल्यास त्याबाबत साशंकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
सिंहस्थ पर्व समाप्तीचे वैशिष्ठय़े म्हणजे, त्र्यंबक येथे शैवपंथीयांसोबत प्रथमच एकत्र आलेले वैष्णवपंथीय साधू-महंत. नील पर्वतावर उभयतांची बैठक भाजप अध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडली. दोन्ही पंथीयांमध्ये समेट घडविण्यामागे उत्तर प्रदेश निवडणुकीचे कारण असल्याचे बोलले जाते. अखेरच्या टप्प्यात संबंधितांनी आपसातील वाद मिटल्याचे जाहीर करत आशादायक पायंडा ठेवला. पुढील सिंहस्थात वैष्णवपंथीय त्र्यंबकेश्वर येथे स्नानासाठी येतील, असेही जाहीर केले गेले. खुद्द अमित शहा यांनी त्याचे स्वागत केले. इतिहास घडल्याची प्रतिक्रिया उमटली. परंतु, हा समेट प्रत्यक्षात येईल की नाही, त्यासाठी एक तप प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मागील तेरा महिन्यांत शैव आणि वैष्णव पंथीयांना एकत्रित आणण्याचे काही प्रयत्न झाले. मात्र, त्यास यश आले नाही. उलट मतभेद उफाळून आले. कुंभमेळ्यास वादाची प्रदीर्घ परंपरा आहे. अशाच वादावरुन सव्वा दोनशे वर्षांपूर्वी वैष्णवपंथीयांनी नाशिक येथे तर शैव पंथीयांनी त्र्यंबकेश्वर येथे स्नान करावे, असा निर्णय झाला होता. सिंहस्थाच्या मूळ ठिकाणावरून त्यांच्यात वाद आहे. नुकत्याच संपलेल्या सिंहस्थात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष कोण, याचाही अखेपर्यंत भक्तांना उलगडा झाला नाही. कारण, वैष्णवपंथीय ग्यानदास महाराज आणि दुसरीकडे शैवपंथीय नरेंद्रगिरी महाराज दोघेही त्यावर दावा करत होते. अध्यक्षपदाचा वाद प्रकर्षांने समोर आला.
सिंहस्थात भाविकांच्या स्वागतासाठी महामार्गावर उभारलेल्या फलकांवरून वादाची ठिणगी पडली होती. भाविकांना चुकीची माहिती देणारे फलक उखडून टाकण्याचा इशारा शैवपंथीयांनी दिला होता. प्रशासन वैष्णवपंथीयांना झुकते माप देत असल्याचेही आरोप त्यांनी केले होते. प्रशासनाने या वादात तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले. परंतु, दोन अध्यक्षांमुळे संबंधितांच्या नाकदुऱ्या काढताना यंत्रणेची दमछाक झाली. ग्यानदास महाराज यांनी प्रारंभी वाद मिटविण्यासाठी अखेरच्या शाही पर्वणीला त्र्यंबक येथे स्नानास जाण्याचे जाहीर केले होते. शैवपंथीयांनी कुशावर्त तीर्थात संबंधितांची स्नानाची वेळ राखीव असल्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही. म्हणजे वैष्णवपंथीय तिकडे फिरकलेच नाही. जे काही महिन्यांत घडू शकले नाही, ते बारा वर्षांनी घडेल, यावर विश्वास कसा ठेवणार?
नाशिकमध्ये नीरस ध्वजावतरण सोहळा
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर चाललेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे गुरूवारी रात्री धर्मध्वजाचे अवतरण करून समारोप झाला. ध्वजारोहण ज्या उत्साहात झाले होते, त्या विपरित स्थिती ध्वजावतरणावेळी पहावयास मिळाली. त्र्यंबकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री, अन्य प्रमुख खात्याचे मंत्री असा लवाजमा असल्याने नाशिकच्या तुलनेत चांगली स्थिती होती. नाशिकमधील सोहळ्यास पुरोहित संघापुरता मर्यादित असे स्वरुप प्राप्त झाले. नाही म्हणायला दुग्ध विकासमंत्री आणि गोदा आरतीसाठी बऱ्याच प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री व पालकमंत्री उपस्थित राहिल्यावर पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. व्यासपीठावरून जो समोर दिसेल, त्याचे नाव पुकारत सत्कार यामुळे त्यास रटाळ स्वरुप प्राप्त झाले. मिरवून घेण्याची अखेरची संधी साधण्याकडे सर्वाचा कल राहिला. सिंहस्थापूर्वी ज्यांच्या नावे खडे फोडले, त्या शासकीय यंत्रणेतील घटकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्र्यंबक येथे ध्वजावतरणाचा मुहूर्त साधला गेला, पण नाशिकमध्ये त्यास दहा ते बारा मिनिटे विलंब झाला. त्र्यंबक येथे भाजपध्यक्षांनी व्यासपीठ सोडल्यानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले. सभा मंडप रिकामे झाले, पण सत्कार सोहळे सुरूच राहिले.