शेतकरी संघटना आता नोंदणीकृत न्यास
शेतकरी संघटना आता नोंदणीकृत न्यास झाला असून त्यामुळे आर्थिक बाबतीत संबंधित कायद्याने उत्तरदायी राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण ठराव येथे रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. याशिवाय आंबेठाण येथे शरद जोशी लिबरल अकादमीची स्थापना आणि जोशी यांच्या स्मृतीदिनी १२ डिसेंबर रोजी दरवर्षी संघटनेचे वार्षिक अधिवेशन घेण्याचा ठरावही करण्यात आला.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्यासह संजय पानसे, अनिल घनवट, गोविंद जोशी, सरोज काशीकर, अजित नरदे, श्याम अष्टेकर, रामचंद्रबापू पाटील, रवी काशीकर आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बैठकीत झालेले ठराव व निर्णयांची माहिती देण्यात आली.
आंबेठाण येथील उपलब्ध जागा व वास्तूचा वापर करून शरद जोशी यांच्या नावाने लिबरल अकादमी सुरू करण्यात येणार असून त्यासाठी वर्षांला २५ लाख रूपये खर्च येणे अपेक्षित आहे.
निधी जमविण्यासाठी संघटनेतर्फे मोहीम हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्था अपेक्षित दिशेने व गतीने सुधारण्याची चिन्हे दिसत नसल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारच्या पातळीवर एकूण शेतीक्षेत्राच्या खुलीकरणाची प्रक्रिया थांबलेली असून याविषयी व्यापक जागृती व आंदोलनाची भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात येणार आहे. संघटनेची स्वातंत्र्यवादी मार्गदर्शन तत्वांशी असलल्या बांधिलकीवरही चर्चा करण्यात आली.
समाजवादी व भीकवादाची फसलेली वाट सोडून शरद जोशी यांनी सतत दाखवलेला आर्थिक स्वातंत्र्याचा व खुलीकरणाचा मार्ग प्रशस्त करणे, त्यासाठी प्रयत्न करणे व निरनिराळ्या रुपात येणाऱ्या समाजवादाच्या धोक्यांपासून सदैव सावध राहण्याचा इशारा देण्यात आला.
शेतकरी संघटना व लिबरल व्यक्ती-संघटना यांचे एक वार्षिक अधिवेशन घेण्याची आवश्यकता व्यक्त करून शरद जोशीं यांच्या स्मृतीदिनी १२ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू करणे तसेच अधिवेशनाआधी महत्वाच्या विषयांवर अभ्यास शिबीर घेऊन अधिवेशनात त्यावर सादरीकरण व चर्चा करण्याचे ठरविण्यात आले., भारतातील सर्वच पक्ष संघटना व स्वयंसेवी संस्था कमी अधिक समाजवाद बाळगत असल्यामुळे त्याविरुद्ध खुलीकरण व स्वातंत्र्यवाद्यांची भक्कम आघाडी उभारण्यासाठी सघटनेने योगदान देण्यसााठी न्यासातर्फे देशातल्या विविध शेतकरी संघटनांची एक प्रतिनिधी बैठक बोलविण्यात येणार आहे. लवकरच तालुका पातळीपर्यंत सर्व कार्यकर्त्यांची नोंदणी व माहिती तयार करण्यात येणार आहे.
बैठकीत शेती, शेतकरी व ग्रामीण अर्थव्ववस्था याविषयी गोविंद जोशी यांनी तर संजय पानसे यांनी मोदी सरकारचे आर्थिक धोरण, काचोळे यांनी शेतकरी संघटनेची असलेली स्वातंत्र्यवादी मार्गदर्शक तत्वांची बांधिलकी, अनिल घनवट यांनी अभ्यास शिबीरांची गरज, सरोज काशीकर यांनी संघटनेचा अन्य प्रांतीय शेतकरी चळवळी व लिबरल गट यांच्याशी संबंध, श्याम अष्टेकर यांनी शरद जोशी लिबरल अकादमी, याविषयी मार्गदर्शन केले.
शरद जोशींच्या नावाने आंबेठाणला अकादमी
जोशी यांच्या स्मृतीदिनी १२ डिसेंबर रोजी दरवर्षी संघटनेचे वार्षिक अधिवेशन घेण्याचा ठरावही करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 01-02-2016 at 01:38 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad joshi liberal academy in nashik