लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : प्रचार पत्रकावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची छायाचित्रे वापरून माकपचे माजी आमदार तथा दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार जे. पी. गावित हे जनतेची दिशाभूल करीत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावित यांचा नामोल्लेख न करता या माजी आमदाराची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप केला.
महाविकास आघाडीचे दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने सामान्य शेतकरी, शिक्षक पेशातील निष्ठावंतास उमेदवारी दिली आहे. प्रचंड उन्हात खेड्यापाड्यातून जमलेल्या समर्थकांनी आता गावोगावी भाजपकडून झालेला अन्याय दाखविण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
आणखी वाचा-नाशिक : भास्कर भगरे कुटुंबीय पावणेदोन कोटींचे धनी
दिंडोरीत काहींनी अपक्ष उभे राहण्याचा विडा उचलला. आपण स्वत: त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी आधीच माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तडजोड केली होती. परंतु, या जिल्ह्यातील माजी आमदाराने अपक्ष उभा राहणारच, असा हट्ट धरला. महाविकास आघाडीची मते खाण्यासाठी हा उद्योग आहे. ज्या जागांवर अडचणी दिसतात, तिथे तिथे भाजप आणि महायुती काही वेगळे मार्ग अवलंबत आहे. चवथा, पाचवा माणूस उभा करायचा. त्याला सर्व यंत्रणा, साधने देत उभे करण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यामुळे नागरिकांनी आपले मत वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
संबंधित उमेदवार महाविकास आघाडीच्या नेत्यांची छायाचित्रे असणारे प्रचारपत्रक वाटून नागरिकांनी दिशाभूल करीत आहे. त्याला आमचा कुठलाही पाठिंबा नाही. त्याच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली जाईल, असे पाटील यांनी सूचित केले. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी संबंधित पत्रके माकपचे उमेदवार, माजी आमदार जे. पी. गावित यांनी छापल्याचा आरोप केला. त्यांच्याविरुध्द पक्षाकडून तक्रार केली जाणार आहे.
आणखी वाचा-नाशिक : राजाभाऊ वाजेंच्या संपत्तीत पाच वर्षात पाच कोटींनी वाढ
शांतिगिरी महाराजांच्या फेरीत लहान मुले?
नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांनी समर्थकांसह आतापर्यंत दोनवेळा अर्ज दाखल केला आहे. एकदा त्यांच्या प्रचारात लहान बालकाचा सहभाग असल्याची तक्रार निवडणूक शाखेकडे प्राप्त झाली. छायाचित्रणाच्या पडताळणीतून या तक्रारीची चौकशी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.