नाशिक – शरद पवार यांचे आपल्यावर प्रेम असल्याने त्यांनी येवला मतदार संघातून सभेला सुरूवात केली, याचा आनंद वाटतो. येवलेकरांच्या प्रेमामुळे चार वेळा आमदारकीची माळ गळ्यात पडली. त्यांचे प्रेम असेपर्यंत येवल्यातूनच निवडणूक लढविणार, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शनिवारी प्रथमच येथे आलेल्या भुजबळ यांचे पाथर्डी फाटा येथे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. क्रेनवरुन त्यांना मोठा पुष्पहार घालण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईपासून नाशिकपर्यंत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत म्हणजे आमचा निर्णय योग्य होता हे दर्शविणारे आहे. रिपब्लिकन पक्षाचेही पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित होते. मंत्रिपदाची शपथ घेतल्याचे अप्रूप नाही. आजवर अनेक वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “मी इथे माफी मागण्यासाठी आलोय, कारण…”, येवल्यातल्या सभेत बोलताना शरद पवार भावनिक

२०१४ पासून ज्या काही घडामोडी झाल्या, त्याचा उहापोह मुंबई येथे झालेल्या सभेत केला आहे. शरद पवार यांनी आपणास जुन्नर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता. जुन्नर पुण्यात येत असल्याने तो सुरक्षित मतदारसंघ होता. त्याचवेळी एरंडोल, वैजापूर, येवला या मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्याची मागणी होती. येवला येथे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत असतांना प्रचारासाठी गेलो होतो. सभेपुरता संबंध होता. येवल्याचे सरपंच आणि काही पदाधिकाऱ्यांनी आपण येवल्यातून निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न करीत होते. येवला सर्वदृष्टीने मागास आहे. येथे विकासासाठी या, असे त्यांचे म्हणणे होते. येवल्यात कामाला संधी असल्याने तेथून निवडणूक लढवली, असे भुजबळ यांनी सांगितले. आपण शरद पवार यांची साथ सोडल्याने त्यांच्याकडे ओबीसी चेहरा राहिला नसल्याकडे लक्ष वेधले असता भुजबळ यांनी मौन बाळगत पवार साहेब येवला येथील सभेत काय बोलतात, त्या सर्व प्रश्नांची रविवारी उत्तरे देणार, असे सांगितले.

Story img Loader