उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आहे. या नंतर बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंग बांधला आहे. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातून शरद पवार राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तेव्हा प्रसारमाध्यमांशी शरद पवारांनी संवाद साधला आहे.
यावेळी मुंबईत पराभव झाल्यानंतर येवल्यातून निवडून आणलं, भुजबळांनी जाण ठेवली नाही? असा सवाल शरद पवारांना प्रतिनिधीने विचारला. त्यावर शरद पवार स्पष्टीकरण देत म्हणाले, “छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाला होता. आमची इच्छा होती, भुजबळांची विधानसभेत आवश्यकता आहे. नाशिकच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यावर भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढवण्याचं सुचवलं होतं.”
हेही वाचा : “सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांकडे दुर्लक्ष”, प्रफुल पटेलांच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
“काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर आम्ही काँग्रेस एस नावाचा पक्ष स्थापन केला. तेव्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला सर्व जागा निर्विवाद निवडून दिल्या होत्या. त्यात जर्नादन पाटील दोनदा तर एकदा मारुतीराव पवार येवल्यातून निवडून आले होते. त्यामुळे तीनवेळा आमच्या विचारांची व्यक्ती येवल्यातून निवडून येते. म्हणून येथील लोक आणि सहकाऱ्यांची संमती घेतली. आणि भुजबळांना येथून उमेदवारी देण्यात आली होती,” अशी माहिती शरद पवारांनी दिली.
हेही वाचा : “मी राजकारणात कुणालाही शत्रू मानत नाही, कारण…”; शरद पवार सूचक वक्तव्य चर्चेत
अजित पवारांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. याबद्दल विचारल्यावर शरद पवार यांनी म्हटलं की, “ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ…. १९७८ साली मी मुख्यमंत्री असताना मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते. तेव्हा ते ८४ वर्षाचे होते. पण, ते दिवसातून किती तास काम करायचे, याची चर्चा न केलेली बरी. वय होतं, यात काही वाद नाही. पण, प्रकृती चांगली ठेवली, तर वय साथ देतं.”