पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विविध विकासकामांसाठी मोदी काल मुंबई दौऱ्यावर होते. महिन्याभरातला मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा होता. त्यामुळे विरोधकांकडून याचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. त्या त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते या ठिकाणी येत आहेत. काही हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही जर देणार असतील, राज्याचं हीत करत असतील तर विरोध करायचं आमचं काही कारण नाही. पण इथे येऊन राजकीय भाषणं करणार असतील, तर त्याचा विचार त्यांनीच करावा.”
हेही वाचा – “…आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली” संजय राऊतांचं मोठं विधान!
आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मोदींचे मुंबई दौरे होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही मोदींवर खोचक शब्दांत टीकाही केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत? –
“जोपर्यंत महानगर पालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत राहू शकतो. कारण पालिका जिंकण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातले भाजपा आणि मिंधे गटाचे लोक असमर्थ आहेत. ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा इतर राज्यांत त्यांनी लावला तसा आख्खा देश जरी इथे लावला, तरी मुंबई महानगर पालिका शिवसेना जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळेच आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय”, असं संजय राऊत म्हणाले. “ते आहेत देशाचे पंतप्रधान आणि लक्ष कुठंय तर मुंबई महानगर पालिकेवर. याचा अर्थ इथले सगळे भाजपा आणि मिंधे गटाचे नेते नाकर्ते आहेत. म्हणून पंतप्रधानांना बोलवलं आहे. कदाचित पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत घर घेऊन राहतील. राजभवनात राहतील”, असं संजय राऊत काल म्हणाले होते.