लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चित झाला असून, नऊ आणि दहा जुलैला ते दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील मुक्ताईनगर, पारोळा व धरणगाव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती पक्षाचे संघटन सरचिटणीस डॉ. सुनील नेवे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपण राज्यभरात दौरे करून पक्षाशी बेईमानी करणार्यांच्या विरोधात हल्लाबोल करणार असल्याचे जाहीर केले होते. शरद पवार हे नऊ जुलैला जिल्ह्यातील पारोळा येथे दाखल होणार असून, सायंकाळी सहाला त्यांची जाहीर सभा होणार आहे. दहा जुलैला दुपारी दोनला मुक्ताईनगर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सभा होईल. सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष तथा पक्षाच्या नेत्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दहा जुलैला सायंकाळी पाचला धरणगाव येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या मैदानावर शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. तेथील सभास्थळीही कामांना स्थानिक पदाधिकार्यांकडून प्रारंभ झाला आहे. पारोळा येथे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्यांकडून सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे 

Story img Loader