नाशिक : शेतमालास चांगले दर मिळण्यासाठी राज्यातील १० हजार गावांत कृषी व्यवसाय संस्थांची स्थापना करून अंबानींसह ४३ उद्योग समूहांशी (कॉर्पोरेट्स) करारान्वये मूल्यवर्धित साखळी निर्माण केली जाणार आहे.  नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेद्वारे तीन वर्षांत दिवसा १२ तास वीज उपलब्ध केली जाईल. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी, गिरणा खोऱ्यात वळवून नाशिक-नगर-मराठवाडय़ातील पाण्याचा वाद  मिटविला जाईल. शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित अशा अनेक मुद्दयांवर येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाचे सावट असताना शनिवारी येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिल्यामुळे राज्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाकडे उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष वेधले. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवत आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यकता भासल्यास केंद्राकडून मदत मिळवली जाईल. वित्त खात्यातर्फे सर्वाना समान न्याय व सर्व भागांचा समतोल विकास या तत्त्वावर काम केले जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाटय़ाने विकास होत असल्याकडे लक्ष वेधले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, केंद्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये, दिवसा वीज देण्यासाठीचे नियोजन आदींची माहिती दिली. शेतमालास चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व्यवसाय सोसायटय़ांना शीतगृह, गोदाम व तारण योजनेचाही लाभ मिळणार असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सामान्यांसह मुख्यत्वे शेतकरी वर्गासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची जंत्री मांडली.

ठाकरेंवर टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. शिंदे यांनी तर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली चांद्रयान मोहिमेने भरारी घेतल्याचे सांगितले. कुणावर टीका करायची नाही, असे एकिकडे सांगत शिंदे आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस हे निष्कलंक असून त्यांचे नाव अभिमानाने घ्यायला हवे. पण, त्यासाठी मोठेपणा, दिलदारपणा असावा लागतो. कोत्या वृत्तीच्या लोकांकडे तो नसतो, अशी ठाकरे यांच्यावर टीका केली.

शासन आपल्या दारीमुळे काहींना पोटदुखी होत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही तो संदर्भ घेत आता कोणाच्याही पोटात दुखलं तरी त्यावर औषध देण्यासाठी डॉक्टर एकनाथ शिंदे तयार असल्याचे सांगितले. आम्हा तिघांना राजकारण, अर्थकारण, शेती आणि सहकारातील चांगले कळते, असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे यांना हाणला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shasan aaplya dari event in nashik in presence of cm eknath shinde devendra fadnavis and ajit pawar zws