नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित आहे. हे आमदार अपात्र झाले तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे राज्यातील शिंदे-भाजप सरकार अजूनही टांगणीवर आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.
आमदार अपात्रतेची प्रक्रिया आपल्यासमोर सुरू झाली होती, तेव्हा विद्यमान विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे त्याचा भाग नव्हते. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा आपल्यासमोर होईल, असेही झिरवाळ यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना (शिंदे गट) प्रतोद नियुक्ती चुकीच्या पध्दतीने झाल्याचे स्पष्ट केले आहे. गटनेता, प्रतोद चुकीच्या पध्दतीने नेमले गेले. या स्थितीत आता गटनेत्याविषयी संशय तयार होईल. गटनेता, प्रतोद पक्षप्रमुखाने नेमायचे असतात. त्यामुळे पक्षप्रमुखावर ती बाजू येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे सरकारला दिलासा मिळाल्याचा दावा होत असला तरी या सरकारचे भवितव्य १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय झाल्यानंतर निश्चित होईल, असे झिरवाळ यांनी सांगितले.