प्रल्हाद बोरसे
मालेगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी मालेगाव दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेत उभी फूट पाडून भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या शिंदे यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले असून त्याची सुरुवात मालेगावपासून होत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे गटाला शह देणे आणि बंडखोर आमदारांना ताकद देणे, यावर शिंदे गटाचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची नामुष्की आली. शिंदे यांच्या या बंडामुळे सेनेची सर्वाधिक पडझड मराठवाडय़ात झाली. त्या खालोखाल नाशिक विभागात सेनेला फटका सहन करावा लागला. मराठवाडय़ातील नऊ आमदार आणि एक खासदार तर नाशिक विभागातील सात आमदार आणि एक खासदार या बंडात सहभागी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या दोन्ही विभागातील बंडखोरांमध्ये तत्कालीन कॅबिनेट मंत्री दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश असल्यामुळे शिंदे गटाचा उत्साह द्विगुणित झाला नसता तरच नवल. त्यामुळे आमचीच शिवसेना खरी असा नारा देणाऱ्या शिंदे गटाचा नाशिक, मराठवाडा या दोन्ही विभागात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करत आगामी काळात राजकीय उत्कर्ष साधण्याचा इरादा दिसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालेगाव दौऱ्याकडे त्याच अंगाने बघितले जात आहे.
सेनेतील बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवडय़ात ठाणे, भिवंडीमार्गे नाशिक आणि मराठवाडय़ाचा दौरा केला होता. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेही या भागाचा लवकरच दौरा करण्याचा रागरंग आहे. आपल्या दौऱ्यात आदित्य यांनी बंडखोरांचा गद्दार असा उल्लेख केला होता. त्यांच्या दौऱ्याप्रसंगी जागोजागी मिळालेल्या उत्स्फुर्त पाठिंब्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठीमागे असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आमदार, खासदार शिंदेंच्या कळपात गेले असले तरी पक्ष संघटनेवर ठाकरेंचाच वरचष्मा असल्याचा संदेश लोकांमध्ये गेला. त्याला प्रत्युत्तर देण्याबरोबरच जनमत अधिकाधिक अनुकूल करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे.
सेनेचे मालेगाव बाह्यचे दादा भुसे आणि शेजारचे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुहास कांदे हे दोन्ही आमदार आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा शिंदे गटात दाखल होणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या तिघांच्या बंडखोरीविरोधात नाशकात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मालेगाव आणि नांदगावमध्ये भुसे आणि कांदे यांच्या भूमिकेला मात्र फारसा विरोध असल्याचे जाणवले नाही. अर्थात असे असले तरी या दोघांना पर्याय शोधण्यासाठी ठाकरे गटातर्फे जोरकस प्रयत्न सुरु असल्याने भविष्यात उभयतांची वाट बिकट होऊ नये आणि स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेवर असलेले त्यांचे प्रभुत्व अबाधित रहावे,यासाठी त्यांना बळ देण्याचाही शिंदे गटाचा प्रयत्न दिसतो. ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मालेगावची निवड करणे,हा त्याचाच एक भाग असावा.
पाच जिल्ह्यांतील रखडलेले प्रकल्प व विकासकामांवर मंथन
या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभी येथील तालुका क्रीडा संकुलात नाशिक महसूल विभागाची महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील रखडलेले प्रकल्प व भविष्यकालीन आवश्यक विकासकामे या विषयावर मंथन होणार आहे. त्यानंतर कॉलेज मैदानावर कार्यकर्ता मेळावा होणार आहे. मेळाव्यात मालेगावकरांच्या वतीने मुख्यमंत्री झाल्याबद्दल िशदे यांच्या जंगी सत्काराचे प्रयोजन करण्यात आले आहे. खास शक्तीप्रदर्शन करत हा दौरा धुमधडाक्यात होण्यासाठी भुसे समर्थकांनी जोरकस तयारी सुरू केली आहे. प्रशासनातर्फेही दौऱ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकरवी भुसे यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी काही लोकप्रिय घोषणा होण्याचेही संकेत मिळत आहेत.