सुमारे १२ वर्षांपासून शिवसेनेकडून राज्यसभेची खासदारकी मिळविणारे संजय राऊत यांनी राज्यसभेत कोणते प्रश्न मांडले आहेत, असा प्रश्न शिंदे गटाचे येथील खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थित केला आहे. राऊत यांनीच शिवसेनेची विल्हेवाट लावली असून राजकारणाची पातळी खालावण्याचे काम ते करीत आहेत, अशी टीकाही गोडसे यांनी केली आहे.
नाशिक येथे शुक्रवारी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत यांनी गोडसे यांच्यावर आगपाखड केली होती. राऊत यांनी केलेल्या आरोपांना आणि टिकेला उत्तर देण्यासाठी गोडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोडसे यांनी राऊत यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले. खासदारकीसाठी चेहरा नको तर, काम महत्वाचे असते, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेविरोधात राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. त्यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते आयत्या बिळावर नागोबा असून सातत्याने फक्त राजकारणावर बोलून राजकारणाची पातळी खालावल्याचे काम त्यांच्याकडूनच केले जात आहे.
हेही वाचा- संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…
नाशिकचे संपर्कप्रमुख म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहत असताना त्यांनी नाशिकचे कोणते प्रश्न सोडविले, त्यांनी नाशिकचे उद्योजक, कामगारांच्या बैठका घेतल्या का, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या का, असे प्रश्नही गोडसे यांनी उपस्थित केले. आपला चेहरा लोकप्रिय असल्याचा त्यांचा समज असेल तर, त्यांनी नाशिकमधून शिंदे गटाविरुध्द निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही गोडसे यांनी दिले. पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि आपल्यात समन्वय असून कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी नमूद केले.