नाशिक : जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पुतळ्यांसह महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांचा समावेश होता. ढोल वादन, लेझीम असे सर्व काही या मिरवणुकीत होते. विशेष म्हणजे, शिवजयंतीनिमित्त काही व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांसाठी वस्तूंच्या खरेदीवर सवलत जाहीर केली होती. काही संस्था, संघटनांनी विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ले करणे, वक्तृत्व तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या पताका, झेंडे, फलक यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. पोवाडा, शिवछत्रपतींच्या जीवनावरील गाणी सर्वत्र ऐकू येत होती. काही सामाजिक संस्थांच्यावतीने रक्तदान तपासणी, आरोग्य शिबीर घेण्यात आले. काही संस्थांनी आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक साहित्यांचे वितरण केले.

अश्वारूढ शिवाजी महाराज, राजांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित भव्य देखावे जयंतीचे आकर्षण राहिले. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकांमुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले होते. सिटीलिंक शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करण्यात आल्याने प्रवाशांना अडचणी आल्या. दुसरीकडे, शहर परिसरातील व्यावसायिकांनी चहा, खाद्य पदार्थ यावर काही सवलती शिवजयंतीनिमित्त दिल्या.

शहरातील शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीला जुन्या नाशिकमधील लाकडी बारवपासून सुरुवात झाली. मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मिरवणुकीत छत्रपती सेनेचा निष्ठेचा पायरीचा देखावा, शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यासह पाच ते सहा मंडळ सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीला वेगळीच शोभा आली.

मिरवणुकीत युवकांसह युवतींचा उत्साहही वाखाणण्यासारखा होता. मिरवणुकीमध्ये मावळ्यांच्या वेशभूषेत अनेक जण सामील झाले होते. वारंवार जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला जात होता. त्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते. चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती.