नाशिक : शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी सार्वजनिक उत्सव समितीकडून नियोजन होत असतांना या उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिकरोड, नवीन सिडकोसह शहरात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामुळे होणारी वाहतूक लक्षात घेता वाहतूक विभागाच्या वतीने मिरवणूक मार्ग बुधवारी ठराविक वेळेसाठी सर्वप्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
शिवजयंतीचा उत्साह शहरात ओसंडून वाहत आहे. शिवजयंतीनिमित्त शहराच्या वेगवेगळ्या भागात मिरवणुका काढल्या जातात. पंचवटीत मिरवणुकीमुळे बुधवारी दुपारी तीन ते रात्री १२ या वेळेत मालेगाव स्टँड-इंद्रकुंड-पंचवटी कारंजा-दिंडोरी नाका हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मखमलाबाद नाका आणि चिंचबनकडूनही मालेगाव स्टँडकडे वाहनांना येता येणार नाही. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य मिरवणूक जुन्या नाशिकमधील वाकडी बारवपासून सुरु होऊन जहांगीर मशीद-दादासाहेब फाळके रस्ता-दूधबाजार- बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-महात्मा गांधी रोड-रविवार कारंजा-मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजा-मालवीय चौकमार्गे रामकुंड येथे समारोप होईल. या कालावधीत पंचवटी आगार (दोन), निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा या ठिकाणाहून सुटणाऱ्या शहर वाहतुकीची सिटीलिंक बससेवा पंचवटी आगारातून सुरु राहील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ बाजूने शहरात येणाऱ्या सर्व बसेस आणि इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूलाकडून पुढे द्वारकाचौकमार्गे नाशिकरोड, नाशिक शहर आणि इतर ठिकाणी जातील. तसेच पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका चौकमार्गे कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा, अशोकस्तंभमार्गे जाणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस शालिमारमार्गे ये-जा करतील.
नवीन नाशिक परिसरातूनही मिरवणूक निघणार आहे. गरवारे टी पॉईंट ते पाथर्डी फाटा या दरम्यान मिरवणूकवेळी इतर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पाथर्डी गाव, पाथर्डी फाटामार्गे शिवाजी पुतळ्यासमोरून अंबड, सातपूर या मार्गावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.
नाशिकरोडमध्येही वाहतूक बंद
नाशिकरोड परिसर शिवजयंतीमुळे भगवामय झाला आहे. मिरवणुकीमुळे नाशिकरोड आणि जेलरोड परिसरातील मिरवणूक मार्गावरील वाहतूक बंद राहील. शिवजयंती निमित्त १८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने बिटको चौक, सिन्नर फाटा, नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडून उड्डाणपुलाखालून ये-जा करणारी सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी पाच ते रात्री साडेदहा या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे. नांदुरनाका, सिन्नर फाटा येथून उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूकही बंद राहणार आहे.
बुधवारी सिटीलिंक बससेवा कमी प्रमाणात- काही मार्गांमध्ये बदल
शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मार्गांवर साकारण्यात आलेले देखावे आणि मिरवणुका लक्षात घेता अनेक मार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. अशा मार्गांवरील बसेस अन्य मार्गाने वळविण्यात येतील. पोलीस प्रशासनाने ऐनवेळी दिलेल्या सूचनेनुसार देखील मार्गात बदल होऊ शकतात. नवीन सीबीएस येथून सुटणाऱ्या सर्व बसेस निमाणी स्थानकातून सुटतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवास करण्यापूर्वीच प्रवाशांनी संपूर्ण बसफेरीची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे सिटीलिंक प्रशासनाने म्हटले आहे. बुधवारी सिटीलिंकचे सर्व पास केंद्र बंद राहणार आहेत. प्रवास करताना कोणतीही समस्या असल्यास ८५३००५७२२२, ८५३००६७२२२ या मदतवाहिनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.