नाशिक : अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या जाहीर सभेत भाषण करणाऱ्याला भ्रमणध्वनीवरुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देणे आणि नांदगाव तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्याला धमकावणे, या प्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवीगाळ, मारामारी केल्यावर आणि त्याचे पुरावे सापडल्यावर गुन्हा दाखल होणारच, असे सांगत छगन भुजबळ यांनी कांदेंना लक्ष्य केले. नांदगावमधून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यानंतर सुहास कांदे-भुजबळ वादाला धार चढली आहे.

शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांनी दंड थोपटत दहशतीच्या छायेतून नांदगावला बाहेर काढण्याचे आवाहन केल्यापासून भुजबळ आणि कांदे यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. कांदेंनी भुजबळ काका-पुतण्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत कधीकाळी नाशिकमधील गुन्हेगारीला भुजबळ हे जबाबदार असल्याचे आरोप केले. या वादात नवीन अध्याय जोडले जात आहेत. जैन धर्मशाळेजवळील समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आपले भाषण संपताच विरोधी उमेदवार सुहास कांदेंचा भ्रमणध्वनी आला. त्यांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शेखर पगार यांनी दिली. सभेत त्यांनी भ्रमणध्वनीवरील कांदे यांचे बोलणे उपस्थितांना ऐकवले. दुसरा प्रकार नांदगाव तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात घडला. याबाबत विनोद शेलार यांनी तक्रार दिली. भुजबळ यांचा अर्ज भरण्यासाठी आपण तहसीलदार कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी कांदेंनी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कांदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा…पक्षाच्या राजीनाम्यानंतरच समीर भुजबळ मैदानात, शिंदे गटाला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर

u

या घटनाक्रमावर अजित पवार गटाचे नेते आणि समीर यांचे काका छगन भुजबळ यांनी टिप्पणी केली. उपरोक्त घटनांची चित्रफीत बघितली. कोणी शिवीगाळ केली, मारामारी केल्यास गुन्हा दाखल होणे स्वाभाविक आहे. समाजमाध्यमात या घटनांचे पुरावेही पोलिसांना मिळाले. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे विरोधी पक्ष म्हणून बघावे, शत्रू म्हणून नव्हे, असेही त्यांनी सूचित केले.