नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर, एखाद्या विषयावर काय भाष्य केले असते, हा संदर्भ देत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राच्या सहाय्याने शिवसेनाप्रमुखांमार्फत सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्याची रणनीती शिवसेना ठाकरे गटाने आखल्याचे अधोरेखीत झाले आहे. बुधवारी नाशिकमध्ये होणाऱ्या निर्धार शिबिराच्या पूर्वसंध्येला पक्षाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्मिलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या आक्रमक भाषणाची लघूचित्रफित (टिझर) प्रसारित केली. यातून शिवसेनाप्रमुखांच्या खास ठाकरी शैलीत भाजपला शालजोडे लगावले गेल्याचे दिसत आहे. यापूर्वी मुंबई येथील कार्यक्रमात शिवसेनाप्रमुखांचे असेच भाषण सादर झाले होते. नाशिकच्या निर्धार शिबिरासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्राच्या आधारे नवीन भाषण तयार करण्यात आले. साधारणत १५ मिनिटांचे हे भाषण असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.

खा. संजय राऊत यांनी शिवसेना नवनवीन प्रयोग करीत असते. निर्धार मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दाखविण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून बाळासाहेब स्वत: या शिबिराला उपस्थित आहेत की काय, अशी अनुभूती मिळेल. शिवसेनाप्रमुख हयात असते तर एखाद्या विषयावर काय बोलले असते, याचा उल्लेख खा. राऊत यांनी केला होता. मागील तीन-चार वर्षात शिवसेनेत अनेक घडामोडी घडल्या. पक्षात उभी फूट पडली. यामागे सत्ताधारी भाजप असल्याचा आरोप ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह नेत्यांकडून नेहमी केला जातो. फुटीर गटासह भाजपवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या मदतीने तयार केलेल्या भाषणातून हल्लाबोल करण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.

निर्धार शिबिरात सायंकाळी पावणेपाच ते पाच या कालावधीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक धगधगता विचार (नाशिककरांशी संवाद) याचा पत्रिकेत उल्लेख आहे. १५ मिनिटांच्या या भाषणात शिवसेनाप्रमुख कोणकोणत्या विषयावर बोलणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.