मालेगाव येथील बंडू बच्छाव यांचे असेही औदार्य

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

Police solve problem of relationship between daughter mother and mothers boyfriend
मुलगी आणि प्रियकराच्या नात्यात अडकले आईचे मन, अखेर मुलीनेच…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
couple Decampsa
पतीची किडनी विकून प्रियकराबरोबर पसार; माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने खळबळ
Suhas Hiremath , Karad, India culture,
दातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृती, सुहास हिरेमठ यांचे गौरवोद्गार
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
Delhi Police
Crime Story : सावत्र मुलीचं अपहरण अन् तिच्याबरोबरच थाटला संसार; हादरवून टाकणाऱ्या घटनेचा शोध दिल्ली पोलिसांनी चार वर्षांनी कसा घेतला?
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय

मालेगाव : शहरातील बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक आणि शिवसेना नेते बंडू बच्छाव यांनी कन्येच्या विवाहाप्रीत्यर्थ आप्तस्वकीय, मित्र मंडळीकडून आलेली आहेराची जवळपास सव्वा नऊ  लाखांची रक्कम शहरातील रमजानपुरा भागातील मुस्लीम समाजातील आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भेट म्हणून दिली. आगीत संपूर्ण घरे बेचिराख झाल्याने संसार उघडल्यावर पडलेल्या १८ गरीब कुटुंबीयांना घरांच्या पुनर्बाधणीसाठी मिळालेल्या या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असून बच्छाव यांच्या या दातृत्वाकडे धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

२८ नोव्हेंबरच्या रात्री शहरातील रमजानपुरा भागातील १८ घरांना आग लागली होती. या आगीत घरे, संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने या कुटुंबीयांचे संसार उघडय़ावर पडले. त्यामुळे या कुटुंबीयांना शेजारच्या शाळेचा आणि नातेवाईकांच्या घरांचा आसरा घ्यावा लागला आहे. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी जाऊन अनेकांनी आपद्ग्रस्तांचे सांत्वन केले. तसेच पंचनाम्याचे शासकीय सोपस्कारही पार पडले, परंतु अजूनही प्रत्यक्षात या कुटुंबीयांपर्यंत शासकीय मदत पोहोचू शकली नसताना, झळ बसलेल्या सर्व १८ कुटुंबीयांना रझा अ‍ॅकॅडमी, सुन्नी जमेतुल उलेमा आणि बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचाच भाग म्हणून बच्छाव यांनी नव्याने घरबांधणीसाठी आहेरातील रकमेतून प्रत्येकी ५१ हजार, साडीचोळी आणि कपडे अशी मदत दिली आहे.

बच्छाव यांची कन्या प्राजक्ता हिचा विवाह नाशिक येथील बाळासाहेब कोल्हे यांचे चिरंजीव प्रतीक यांच्याशी येथे झाला. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत धडाडीचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या बच्छाव यांचा मोठा गोतावळा असल्याने या विवाहाच्या निमित्ताने वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.

विवाहाप्रीत्यर्थ आहेर देणाऱ्यांचीही अशीच रीघ लागली होती. आहेराच्या रकमेची मोजदाद केल्यावर ती सव्वा नऊ  लाखांपर्यंत गेली. ही सर्व रक्कम रमजानपुरा येथील आपद्ग्रस्तांना देण्याचे आधीच मनोमन ठरवलेल्या बच्छाव यांनी ऐन वेळी हा निर्णय जाहीर केल्यावर उपस्थित आप्तस्वकीय, मित्रमंडळी अवाक् झाली. त्यानुसार विवाह समारंभ पार पडल्यावर वधुवरांच्या हस्ते ही सर्व रक्कम आपद्ग्रस्तांकडे सुपूर्द करण्यात आली. मजुरीद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या आणि आगीमुळे संसार उघडय़ावर पडलेल्या या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर घरांच्या पुनर्बाधणीसाठी मिळालेल्या या मदतीमुळे आनंदाची लकेर उमटली नसती तरच नवल! तसेच मुलीच्या लग्नातील आहेराची संपूर्ण रक्कम मुस्लीम समाजातील गरीब कुटुंबीयांच्या घरउभारणीसाठी कारणी लावण्याच्या बच्छावयांच्या या निर्णयामुळे हिंदू-मुस्लीम या दोन्ही समाजांतील सौहार्दाचे नाते घट्ट होण्यासाठीही मोलाचे ठरणार आहे.

२०१७ मध्ये नवकिरण सायाजिंगला लागलेल्या आगीच्या वेळीही बच्छाव यांनी आर्थिक मदत केली होती. तालुक्यातील निमगाव येथे कर्ता पुरुष गमावल्याने पोरके झालेल्या एका गरीब कुटुंबाला दोन लाखांची आर्थिक मदत देऊन त्यांनी हातभार लावला होता. करोना संकटकाळातही अनेक रुग्णांना त्यांनी आर्थिक, वैद्यकीय मदत मिळवून दिली. करोना महामारीचे संकट ऐन भरात असताना लोकांना नीट उपचार मिळत नव्हते, तेव्हा शहरासह ग्रामीण भागातील जनतेस उपचार सुविधा मिळावी म्हणून मोठी धडपड करत त्यांनी युनानी डॉक्टरांची मदत घेतली. टाळेबंदीच्या काळात जवळपास चार हजार गरीब कुटुंबांना धान्य, जीवनावश्यक वस्तूंच्या रूपात त्यांनी मदत वाटली होती.

औरंगाबाद येथील एका मारवाडी कुटुंबाने लग्नात आलेल्या आहेराची संपूर्ण रक्कम गरिबांच्या घरांच्या उभारणीसाठी खर्च केली होती. ही बाब आपल्याला फारच भावल्याने मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व रक्कम आपद्ग्रस्तांना घरे उभारण्यासाठी देण्याचे मी आधीच ठरविले होते. त्याद्वारे गरिबांचा जो आशीर्वाद मिळेल, त्यातून मुलीचा संसार आणखी सुखावेल असा विश्वास आहे.

– बंडू बच्छाव (संस्थापक, बारा बलुतेदार मित्र मंडळ, मालेगाव)

Story img Loader