नाशिक : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब समर्थनार्थ काढलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने (एकनाथ शिंदे) येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आझमी यांच्या छायाचित्राला जोडे मारण्यात आले.जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, शामकुमार साबळे आदींच्या नेतृत्वाखाली त्र्यंबक रस्त्यावरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात चित्रफिती व छायाचित्रही दाखल झाले असून त्यातून या घटनेचे भयावह स्वरुप उघड झाले आहे.
महाराष्ट्रात खंडणीसाठी व दहशत निर्माण करण्यासाठी एका सरपंचाची अशी हत्या होणार असेल तर अशा सर्व आरोपींना त्वरित फाशी झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील कायदा सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी व अशा विकृतींचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सरपंच हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे , अशी मागणी करण्यात आली.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी कौतुकास्पद विधान केल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याकडे लक्ष वेधत शिवसैनिकांनी आझमी यांच्या छायाचित्राला चपला मारून निषेध आंदोलन केले.