लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: महाविकास आघाडीकडून वारंवार खोके, गद्दार म्हणून हिणवले जात असल्याने शिवसेनेने (शिंदे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीत केलेली विकास कामे मांडून विरोधकांना प्रत्युत्तर दिले. प्रतिकात्मक आंदोलनात शिवसेनाप्रमुखांचे दाखले देत उध्दव ठाकरे गटासह राष्ट्रवादीला लक्ष्य केले. ज्या राष्ट्र्रवादीचा जन्म मुळात काँग्रेसशी गद्दारी करून झाला, त्यांना आम्हाला गद्दार बोलण्याचा काय अधिकार, असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला.
राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता धोक्याने, ५० खोक्याच्या आमिषाने, गद्दार आमदारांच्या सहाय्याने परावर्तीत झाल्याचा आरोप करीत निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ५० खोके, एकदम ओके हे आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना गद्दार, खोक्यांच्या मुद्यावरून हिणविले जाते. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी शिवसेना युवासेनेच्यावतीने २० जून हा बंडाचा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक उठाव करून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापन केल्याकडे शिवसैनिकांनी लक्ष वेधले. या ठिकाणी शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांच्या माहितीचा भलामोठा फलक लावण्यात आला. मायको चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय परिसरात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले
हेही वाचा… राष्ट्रवादीतर्फे खोक्यांसह आंदोलन
शिवसेनाप्रमुखांनी ज्या दिवशी शिवसेनेची काँग्रेस होईल, त्या दिवशी मी माझी शिवसेना बंद करेल, असे म्हटले होते. सत्तेसाठी उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करून शिवसेना व धनुष्यबाण हा काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, असा आरोप आंदोलकांनी केला. राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनावरही शिवसेनेने आगपाखड केली. राष्ट्रवादीने पहाटेच्या शपथविधीबाबत आधी बोलावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, शाम साबळे, शशिकांत कोठुळे,अमोल सूर्यवंशी, सचिन भोसले, सुवर्णा मटाले, मंगला भास्कर आदी सहभागी झाले होते.