नाशिक – सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आणि मंत्र्याच्या मुलींनाही एकच न्याय असेल. महिलांवरील अत्याचार प्रकरणात राजकारण करणे योग्य नाही. अत्याचार करणाऱ्यांना भररस्त्यात शिक्षा दिली पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
रविवारी येथे जागतिक धम्म परिषदेनिमित्त आले असता आमदार शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भररस्त्यात फोडले जाईल, ही आमची भूमिका आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अवघ्या ८० दिवसात आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याकडे शिरसाट यांनी लक्ष वेधले. विधीमंडळाचे सोमवारपासून अधिवेशन सुरु होत असल्याने रायगडच्या पालकमंत्रीपदाविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील. ठाकरे गटाला राज्यात गळती सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यात नाशिकमध्ये अनेकांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केल्याचे शिरसाट यांनी नमूद केले.