नाशिक : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) गटाने थेट हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज पाठवून देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का दिला. देवळालीत राजश्री अहिरराव आणि दिंडोरीतून धनराज महाले यांनी शिंदे गटाच्यावतीने अर्ज दाखल करुन अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली. अखेरच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी महायुतीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे.
अजित पवार गटाने देवळालीत आमदार सरोज अहिरे आणि दिंडोरी मतदारसंघात विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांना उमेदवारी दिली आहे. संबंधितांनी अर्ज दाखल करून प्रचारास सुरूवात केली असताना अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांना शिंदे गटाकडून धक्का दिला गेला. जागा वाटपाच्या चर्चेत या दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रही होता. एकसंघ शिवसेनेचा देवळाली हा गड मानला जातो. अडीच दशके या ठिकाणी पक्षाचा आमदार होता. गतवेळी एकसंघ राष्ट्रवादीने ही जागा शिवसेनेकडून खेचून घेतली होती. दिंडोरीत माजी आमदार धनराज महालेंना पक्ष प्रवेशावेळी तिकीटाचा शब्द दिला गेला होता. परंतु, जागा वाटपात हे मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे अखेरच्या दिवशी शिंदे गटाने मैत्रीपूर्ण लढतीचे नाव देऊन बंडखोरीचे अस्त्र उगारले. पक्षाने एबी अर्ज खास हेलिकॉप्टरने नाशिकला पाठविले. उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दुपारी तीनच्या आत संबंधित उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचतील, याचे नियोजन केले.
हेही वाचा…भाजपा प्रवक्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आणि प्रवेशाआधीच उमेदवारीही जाहीर; १२ तासांच्या आत सगळं घडलं!
शिवसेनेने (शिंदे गट) दिंडोरीत धनराज महाले आणि देवळालीतून माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना एबी अर्ज दिल्याचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी सांगितले. अखेरच्या क्षणी हा निर्णय घेतला गेला. महायुती व महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असल्याने आधीच बंडखोरीला उधाण आले आहे. यात मित्रपक्षांच्या बंडखोरीने आणखी भर पडली.
हेही वाचा…विमानात बॉम्बच्या धमकीप्रकरणी आतापर्यंत १२ गुन्हे दाखल
दबावतंत्राची खेळी
नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ हे अपक्ष मैदानात उतरले आहेत. नांदगावमध्ये अजित पवार गटाकडून अप्रत्यक्षपणे शिंदे गटाविरोधात बंडखोरी झाली. तशीच अजित पवार गटाच्या उमेदवारांविरोधात शिंदे गटाकडून बंडखोरी केली जाईल, असा संदेश यातून दिला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शिंदे गटाने मित्रपक्षाच्या दोन मतदारसंघात अधिकृत उमेदवार देत दबावतंत्राची खेळी केल्याचे दिसत आहे.