नाशिक : विधानसभा निवडणुकीचार प्रचार आता कुठे सुरु होत असताना जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना गुरूवारी हृदयविकाराचा झटका आला. ते जळगावहून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना वाटेत ममुराबाद गावाजवळ अचानक त्यांची प्रकृती बिघडली. कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले.
प्रभाकर सोनवणे यांच्या प्रकृतीत सध्या लक्षणीय सुधारणा असून ॲज्निओप्लास्टी करण्यात आली आहे. प्रकृती स्थिर असून त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सोनवणे यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समजताच नातेवाईक, मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली. लवकरच वडील प्रचारात सक्रिय होतील, अशी माहिती त्यांचे पुत्र दिनेश सोनवणे यांनी दिली.
हेही वाचा…त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन दर्शन सुविधा
शिवसेनेने (उध्दव ठाकरे) चोपडा विधानसभा मतदारसंघातून आधी राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, तडवी यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे तडवी यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून प्रभाकर सोनवणे यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. सोनवणे हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले असून २०१९ मध्येही त्यांनी चोपड्यातून निवडणूक अपक्ष उमेदवारी करीत लढवली होती.