नाशिक : अमित शहा यांच्याबरोबर उद्धव ठाकरे कधीही जाणार नाहीत. सत्तेत जाण्यासाठी आम्ही लाचार होणार नाही. लबाड्या करणाऱ्यांबरोबर आम्ही जाणार नाही, असे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.शहरात बुधवारी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) विभागीय शिबीर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या शिबिराविषयी माहिती देण्यासाठी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी विविध मुद्यांवर मत व्यक्त केले.

सध्या फुले चित्रपटावरुन वाद सुरु आहे. या चित्रपटावर टीका करणाऱ्या ब्राम्हण संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाच्या बाहेर आहेत का, असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला. फुले चित्रपटात जे दाखविले ते साहित्यात आहे. या विषयावर फडणवीस का बोलत नाहीत. वाद मिटवला पाहिजे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी इतर विषयांवर बोलण्यापेक्षा लाडक्या बहिणींमुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही, त्यात लक्ष द्यावे, असेही राऊत यांनी सांगितले. गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत आहे. गुजरातच्या राजकारणातून येणारा पैसा देशात जातो. नाशिकलाही गुजरातमधूनच अमली पदार्थ येतात, असा दावा राऊत यांनी केला.

शिबिरात बाळासाहेबांच्या भाषणाची अनुभूती

नाशिक येथील शिबिरात उद्धव ठाकरे यांच्याशिवाय कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचेही मार्गदर्शन होणार असून कार्यकर्त्यांवर दाखल होणारे खोटे खटले, चुकीचा प्रचार, याविषयीही मार्गदर्शन करतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कधीही न ऐकलेले भाषण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दाखविण्यात येणार आहे. या माध्यमातून बाळासाहेब स्वत: या शिबिराला उपस्थित आहेत की काय, अशी अनुभूती येईल, असे खासदार राऊत यांनी सांगितले.