नाशिक – येथील ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने ३० एप्रिल ते पाच मे या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता तपोवनातील बाबूशेठ केला मैदानात शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ज्ञानवर्धिनी संस्थेच्या वतीने गोपाळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तळ्याची वाडी ट्रँक्विल मिडोज यांच्या वतीने शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होणार असून यामध्ये अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह १५० कलाकार सहभागी होणार आहेत. या माध्यमातून जमा होणारा निधी हा संस्थेची नवीन इमारत बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे. संस्था शिक्षण तसेच विषमुक्त शेतीसाठी काम करत आहे. याविषयी खासदार कोल्हे यांनी माहिती दिली. २०२३ मध्ये या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये झाले होते. आपला सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. छावा चित्रपट आला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष आला. परंतु, हा इतिहास सर्वांना सतत सांगितला पाहिजे. जे उदात्त ते महाराष्ट्र स्वीकारत आहे. हे महानाट्य संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारीत आहे. मागील काही दिवसांमध्ये चुकीच्या पध्दतीने इतिहास सांगितला जात आहे. असे सांगणाऱ्या विद्वांनापुढे मी पामर काय बोलणार, असा टोला खासदार कोल्हे यांनी मंत्री नितेश राणे यांना नाव न घेता हाणला.

Story img Loader