नाशिकमध्ये महाविकास आघाडीमधील खास करुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर हा वाद कोणत्या थराला जातो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मुख्य विरोधी पक्ष भाजपा आणि मनसेशी सामना करतांना राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना त्यांची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. म्हणूनच नाशिकमध्ये आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु होत निवडणुकीची पार्श्वभुमि तयार होत असल्याचं बघायला मिळत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी याआधी त्यांच्या मतदारसंघाला पालकमंत्री भुजबळ यांनी पुरेसा जिल्हा नियोजन निधी दिला नसल्याचा आरोप केला होता. आज पत्रकार परिषद घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे पद छगन भुजबळ यांच्याकडून काढून घ्यावे अशी मागणी कांदे यांनी केली आहे. तसंच भुजबळ हे हजारो कोटींचे मालक कसे झाले असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदमध्ये उपस्थित केला. भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाहीत तर प्राचार्य आहेत असा घणाघाती हल्ला सुहास कांदे यांनी भुजबळांवर चढवला. भुजबळांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत असा दावाही सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदमध्ये केला.
तर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. हा कलगीतुरा थांबला पाहिजे, माझ्या दृष्टीने वाद संपला आहे असं सांगत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या वादावर अधिक बोलण्याचे टाळले. नांदगावला निधी कमी मिळाला ही वस्तुस्थिती नाही असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. घरातलं भांडण चव्हाट्यावर आणायचं कारण नाही असं सांगत या विषयावर जास्त बोलणे छगन भुजबळ यांनी टाळले.