धुळे शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून देवपूरातील लाला सरदार नगर, एकविरा देवी मंदिर परिसरात १२ दिवसांपासून नळांना पाणी आलेले नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी प्रभाग क्र. तीनचे एमआयएमचे नगरसेवक सईद बेग हाशम बेग यांनी कार्यकर्त्यांसह नव्या जलकुंभावर चढून आंदोलन केले. मनपा प्रशासनाने तीन दिवसात जलकुंभ सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
१२ दिवसांपासून प्रभागात नळांना पाणी नाही
देवपूरातील लाला सरदार नगर, एकविरादेवी मंदिर रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या परिसरात दाटवस्ती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. काही भागांत पाणी मिळते तर, काही भागात नाही. अनेक दिवसांपासून या समस्येला समोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेत नगरसेवक सईद बेग हाशम बेग यांनी यापूर्वी अनेक निवेदने दिली. पाच सप्टेंबरच्या महासभेत देखील पत्र दिले आहे. या भागात नवीन जलकुंभ उभारुन दोन वर्ष झाली आहेत. नवीन जलकुंभ तयार असूनही त्याचा उपयोग केला जात नाही. या जलकुंभात दुरुस्तीची किरकोळ कामे बाकी असल्याचे मनपा अभियंत्यांकडून सांगण्यात येते. आमदारांनी सूचना देवूनही जलकुंभ सुरु केला जात नाही. १२ दिवसांपासून प्रभागात नळांना पाणी आलेले नाही, त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे लागत असल्याचे नगरसेवक बेग यांनी सांगितले.
हेही वाचा- ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; मालेगावात महाविकास आघाडीचे आंदोलन
प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष
नवीन जलकुंभाचा वापर सुरु केल्यास प्रभातनगर, गुलाब हाजी नगर, मदनी नगर, गौसिया नगर, विटाभट्टी, दुर्गा देवी मंदिर परिसर, आयशा नगर, लाला सरदार नगर, मोहम्मदी नगर, एकविरादेवी मंदिर परिसर, भाई मदाने नगर, पंचवटी आदी परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल. परंतु, मनपा प्रशासन आणि सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा रोष यावेळी नागरीकांनी व्यक्त केला. नगरसेवक बेग यांनी जलकुंभावर ठिय्या दिला तर, इतरांनी कुंभाजवळ उभे राहून घोषणाबाजी सुरु केली. जलकुंभावरुनच भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्याव्दारे चित्रफित तयार करुन बेग यांनी जोपर्यंत नवीन जलकुंभ सुरु केला जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, असा इशारा दिला. या इशाऱ्यांची दखल घेणार नसाल तर कपडे उतरवित जलकुंभावर नग्नावस्थेत ठिय्या देणार, असेही त्यांनी जाहीर केले.
हेही वाचा- नाशिक : इंधन प्रकल्पाजवळील नदीतील पाण्याला फेस; शेत पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे
नगरसेवक बेग यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर प्रशासनाची धावपळ उडाली. नवरंग जलकुंभ येथे पोलीस आणि मनपाचे अधिकारी पोहचले. मनपाचे अभियंता कैलास शिंदे यांनी दूरध्वनीवरुन नगरसेवक बेग यांच्याशी चर्चा करुन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र जलकुंभ सुरु करण्याचा आग्रह बेग यांनी कायम ठेवला. तीन दिवसात जलकुंभ सुरु करण्याचे लेखी आश्वासन अभियंता शिंदे यांनी दिल्यानंतर बेग आणि कार्यकर्ते जलकुंभावरुन खाली उतरले.