लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: बालकामगार नसल्याचा अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांना गुरूवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे शहरात हॉटेल आहे. हाॅटेलमध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करुन खोटी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा करत आढाव यांनी तपासणी केली. आढाव यांनी यासंदर्भात निरंक अहवाल पाठवत बालकामगार नाहीत, तसेच गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच मागितली.
हेही वाचा… नाशिक : शिधापत्रिकेवरील धान्याचा काळाबाजार, वाहनातून १२ लाखाचा साठा जप्त
याविरूध्द तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधककडे तक्रार केली. या तक्रारीची पथकाने शहानिशा करुन गुरूवारी दुपारी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेरील आवारात आढाव या पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. आढाव यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.