लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : जिल्ह्यातील येवला आणि लासलगाव या दोन्ही आगारांना बसेसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने या प्रकरणात अखेर ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी लक्ष घातले आहे. येवला, लासलगाव आगारांना प्रत्येकी २५ नवीन बस प्राधान्याने देण्याची मागणी भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात भुजबळ यांनी परिवहन मंत्र्यांना पत्र दिले आहे. येवला, लासलगाव या दोन्ही आगारांमध्ये बसेसचा तुटवडा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून तक्रारी येत आहेत. येवला आगारात करोना प्रादुर्भावापूर्वी ५२ बस होत्या. त्यामुळे येवला तालुक्यातील सर्व गावांना वेळेवर बससेवा मिळत होती. सद्यस्थितीत फक्त ३५ बस उपलब्ध असून त्यातील दोन बस कायम नादुरुस्त असतात. म्हणजेच केवळ ३२ किंवा ३३ बसेसवर काम भागवले जात आहे. करोना काळानंतर २२ बसेस भंगाराता गेल्या आहेत. मात्र एकही नवीन बस न मिळाल्याने आगाराच्या बसेसची संख्या कमी झाली. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच गावांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. काही गावांना जाणाऱ्या बस बंद झाल्याने ग्रामीण भागातील प्रवासी विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येवला आगारास किमान २५ नवीन बसची आवश्यकता आहे.
आणखी वाचा-त्र्यंबकेश्वर बस स्थानकाचे काम अजूनही अपूर्ण
राज्य परिवहन विभागाच्या लासलगाव आगारातील ५६ पैकी २२ बस नादुरुस्त असून केवळ ३४ बस सेवेत आहेत. करोनापूर्वी लासलगाव आगारात ५६ बसेस होत्या. सध्या ३४ बस लासलगाव आगारात प्रवाशांच्या सेवेत आहेत. बाकी गाड्या भंगारात काढल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बसेसच्या कमी संख्येमुळे आगारातून सुटणाऱ्या अनेक बस या वेळेवर सुटत नाहीत किंवा अचानक रद्द केल्या जातात. यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी वेळेत पोहोचता येत नसल्याच्या तक्रारी असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले आहे.
लासलगाव-नाशिक कित्येक बसफेऱ्या बंद
लासलगाव आगारातून पूर्वी नाशिकसाठी दर अर्ध्या तासाने बससेवा सुरू होती. तीच बस नाशिक आगारातून परत लासलगावकडे परत येत होती. त्यामुळे किमान १५ ते २० फेऱ्या दिवसातून लासलगाव ते नाशिक होत होत्या. त्या सध्या पूर्णतः बंद झाल्या आहेत. लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ असल्याने देशाच्या विविध भागातून व्यापारी व कांद्याशी संबंधित असणाऱ्यांची वर्षभर ये-जा चालू असते. परंतु, बससेवेच्या तुटवड्यामुळे त्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.