जळगाव : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू झाला असून, उमेदवारांनी प्रचारालाही वेग दिला आहे. आता प्रचारासाठी अवघे १२ दिवस उरले आहेत. या निवडणुकीत प्रचारावेळी जनता आता मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना थेट प्रश्न विचारु लागल्याचे दिसून येत आहे. रावेर मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनाही हा अनुभव घ्यावा लागला असून रावेर तालुक्यातील कोचूर येथे, त्या प्रचारासाठी गेल्या असता त्यांना जनतेचा रोष सहन करावा लागला.
महाविकास आघाडीतर्फे जळगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून करण पवार आणि महायुतीतर्फे भाजपकडून स्मिता वाघ, तर रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पवार विरुध्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे अशी लढत होत आहे. दोन्ही बाजूंकडून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नेत्यांचे जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. महाविकास आघाडी व महायुतीतर्फे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते मेळावे, बैठका, जाहीर सभा घेतल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाहनांमुळे धुरळा उडाला आहे.
हेही वाचा…आता शक्ती प्रदर्शनाची चढाओढ, नाशिकमुळे महायुतीचा दिंडोरीचा अर्ज भरण्याचा मुहूर्त लांबणीवर
रावेर मतदारसंघात उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांचेही प्रचारदौरे सुरू आहेत. रावेर तालुक्यातील कोचूर गावात प्रचारासाठी त्या गेल्या असता ग्रामस्थांनी रक्षा खडसे यांना घेरत विरोध केला. संतप्त ग्रामस्थांनी त्यांना केलेल्या विकासकामांचा जाब विचारत समस्यांचा पाढाच वाचला. गावात चार विकासकामे दाखवा, असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी विचारत, आपण आतापर्यंत किती विकासकामे केली, आपण निवडून आल्यानंतर काय काय विकासकामे करणार, अशा प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला. त्यानंतर रक्षा खडसे यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह गावातून काढता पाय घेतला. आता मात्र यावरून सुज्ञ मतदार नेत्यांसह उमेदवारांना विकासकामांबाबत प्रश्न विचारू लागले आहेत. नेत्यांनाही आता जनतेला उत्तरे द्यावी लागत आहेत, असे दिसते आहे.