लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: वेतन आणि दंडात्मक कारवाईच्या मुद्यावरून मध्यंतरी वाहकांनी संप पुकारून मनपाची सिटीलिंक बस सेवा तीन दिवस बंद पाडली होती. आता रिक्षाचालक सिटीलिंक विरोधात आंदोलनात उतरले. या दोन्ही आंदोलनात एक समान धागा आहे, तो म्हणजे सिटीलिंकचे वाहक आणि रिक्षा-टॅक्सी चालकांचे नेतृत्व करणारी श्रमिक सेना ही एकच संघटना आहे. हा योगायोग इथेच संपत नाही. बस सेवेत वाहक पुरविण्याचा ठेका सिटीलिंकने ज्या कंपनीला दिला आहे, त्यातही याच कामगार संघटनेतील नेत्याचे हितसंबंध गुंतले असल्याचे सांगितले जाते. कधी सिटीलिंकचा संप तर, कधी रिक्षा-टॅक्सीचालकांचे आंदोलन यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत.

मागील काही महिन्यांत सिटीलिंक बससेवा अनेकदा ठप्प झाली. अलीकडेच ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन न दिल्याच्या कारणावरून वाहकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे सिटीलिंक बस सेवा विस्कळीत होऊन प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. ठेकेदारांमधील राजकारणाने ही स्थिती उद्भवल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा… नाशिक: सिटीलिंक बससेवेविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; रिक्षांअभावी प्रवाशांचे हाल

सिटीलिंक बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक कार्यरत आहेत. ते पुरविण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला गेला आहे, त्या कंपनीने दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्याची वाहकांची तक्रार होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी सुमारे ५०० वाहकांनी केलेल्या आंदोलनात जवळपास तीन दिवस शहर बस सेवा ठप्प झाली होती. सहा महिन्यांपूर्वी ऐन परीक्षा काळात सिटीलिंकची बस सेवा अशीच ठप्प झाली होती. वारंवार होणाऱ्या या प्रकाराला प्रवासी वैतागले आहेत. सिटीलिंकच्या वाहकांनी श्रमिक सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. या संघटनेमार्फत संबंधितांची भूमिका मांडली जाते.

हेही वाचा… पोटदुखीवाल्यांसाठी लवकरच डॉक्टर आपल्या दारी उपक्रम; मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

हे आंदोलन होत नाही तोच, आता रिक्षा-टॅक्सी चालक श्रमिक सेनेच्या नेतृत्वाखाली सिटीलिंकच्या विरोधात रस्त्यावर उतरले. मंगळवारी दुपारपर्यंत शहरातील रिक्षा वाहतूक विस्कळीत झाली. सिटी लिंक सेवेमुळे रिक्षा व टॅक्सी वाहतुकीला मोठी झळ बसल्याचे आरोप त्यांच्याकडून होत आहे. सिटीलिंकची जादा प्रवासी वाहतूक आणि ग्रामीण भागातील वाहतुकीवर संबंधितांनी आक्षेप नोंदविला. या आंदोलनाची झळ बाहेरगावाहून आलेले प्रवासी, नागरिकांसह शहरवासीयांना बसली. आंदोलन सिटीलिंकचे असो वा, रिक्षा-टॅक्सी चालकांचे. दोन्ही ठिकाणी श्रमिक सेना नेतृत्व करीत आहे. वाहक पुरविण्याच्या कामावरून काही राजकीय मंडळींमध्ये चढाओढ आहे. या सर्वाचा परिणाम सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर होत असल्याचे चित्र आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shramik sena is the same union that leads citylink buses and rickshaw taxi drivers in nashik dvr