नाशिक : टंचाई, उन्हामुळे रुक्ष परिसर, आरोग्याच्या तक्रारी यामुळे उन्हाळा हा इतर ऋतुंच्या तुलनेत नकोसा वाटत असताना डोंगरी आदिवासीबहुल भागात मात्र उन्हाळ्यात येणाऱ्या मोहाच्या फुलांमुळे स्थानिकांसाठी उन्हाळा हवाहवासा वाटतो. मोह फुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण पेय, पदार्थांमुळे उन्हाळा आदिवासी बांधवांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेने मोह फुलांपासून बेकरी उत्पादनासह अन्य खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरूवात केली आहे. या माध्यमातून ३०० पेक्षा अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होत असतांना विपणन तसेच उत्पादनाला बाजारपेठ मिळविण्याचा प्रश्न संस्थेसमोर आहे.

मोह फुलांचा उपयोग केवळ दारुसाठी केला जातो, इतपतच अनेकांना माहिती असते. मोह फुलांचा इतरही पदार्थ तयार करण्यासाठी श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. हरसूल, पेठ परिसरातील गावंद, पडवळीपाडा, पळशी, खर्डेपाडा, बर्डेपाडा, आंबेटी या ठिकाणी संस्थेच्या वतीने ८० हून अधिक बचत गट सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून एक हजाराहून अधिक महिला जोडल्या गेल्याचे संस्थेच्या माया खोडवे यांनी सांगितले. आदिवासीबहुल भाग असल्याने या ठिकाणी कोणा प्रशिक्षकाला बोलावून शिकवणे संस्थेला परवडण्यासारखे नाही. यामुळे मोहाच्या फुलापासून गुलाबजाम, शंकरपाळे, लाडु कसे बनवावेत, हे आपण स्वत: घरी तयार करून पाहिले. हे पदार्थ प्रयोगशाळेत पाठवून त्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ते पदार्थ कसे तयार करावेत, हे इतर महिलांना शिकवत असल्याचे खोडवे यांनी सांगितले.

तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी हे काम करायचे हा निश्चय आहे. यंदा शासन भरडधान्य (मिलेट) महोत्सव सर्वत्रत घेत आहे. त्या अनुषंगाने भरडधान्य आणि मोहाचा वापर करत बेकरी उत्पादने सुरू केली आहेत. यामध्ये नागली बिस्किट, गहु-महुआ टोस्ट, कुकीज असे पदार्थ प्रशिक्षक महिलांना शिकवत आहे. या उत्पादनाला मुक्ताई हे नाव देण्यात आले असून नाशिक येथील एका बेकरीमध्ये ही उत्पादने ठेवण्यात आली असल्याची माहिती खोडवे यांनी दिली.

शासकीय पातळीवर भरडधान्याचा जागर होत असतांना सामाजिक स्तरावर मात्र भरडधान्य आणि मोह याविषयी माहिती देतांना अडचणी येतात. खवय्यांना भरडधान्य आणि मोह यांच्यापासून एकत्रित पदार्थ तयार होतात, याविषयी साशंकता आहे. यामुळे अद्यापही अपेक्षित प्रतिसाद आणि बाजारपेठ उत्पादनाला मिळू शकली नसल्याची खंत खोडवे यांनी व्यक्त केली. व्यवसाय वृध्दीसाठी काही कर्ज काढले असून हरसूल येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहाच्या फुलाचे फायदे

मोहाच्या फुलांपासून औषधी आणि पौष्टिक गुणधर्म असलेले पदार्थ तयार केले जातात. मोहाच्या फुलांपासून पारंपरिक पेय केले जाते.मोह फुलांचे वाळवण केले जाते. मोहाच्या बियांपासून साबण तसेच पीठही तयार केले जाते. झाडाच्या पानांपासून वाट्या बनवल्या जातात. मोहाच्या बियांपासून तयार केलेल्या तेलाचा वापर वंगण, ग्रीस आणि मेणबत्त्या तयार करण्यासाठी केला जातो.

मोहपासूनची उत्पादने

श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने मोहाच्या फुलांपासून शंकरपाळे, गुलाबजाम, लाडु यासह भरडधान्याचा वापर करुन नागली बिस्कीट, गहु-महुआ खारी, टोस्ट, कुकीज असे पदार्थ तयार केले आहेत.

Story img Loader