लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : पाथर्डी गावालगतच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित प्रसिध्द कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवपुराण कथा सोहळ्याचा शनिवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. सलग पाच दिवस चाललेल्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आमदार सीमा हिरे व राहुल ढिकले, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार (अजित पवार गट) दिलीप बनकर, माजीमंत्री बबन घोलप अशा सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन पाथर्डी परिसरात करण्यात आले. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिवमहापुराण ऐकण्यासाठी पाचही दिवस लाखोंची गर्दी उसळली. कार्यक्रमस्थळावरील भव्य आसन व्यवस्थाही अपुरी पडली. काहींना जागा न मिळाल्याने घरी परतावे लागले. तर अनेकांनी उन्हातान्हात लहानग्यांना घेऊन मोकळ्या जागेत ठाण मांडली. वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था होती. पण, वाहनतळ ते कार्यक्रम स्थळ यात बरेच अंतर असल्याने भाविकांना पायपीट करावी लागली. बसण्यासाठी जागा नसल्याने काही जण घरून सतरंजी घेऊन आले होते. अपंग भाविकांसाठी कुटुंबियांनी खुर्च्या देखील आणल्याचे पहायला मिळाले. कार्यक्रमस्थळी सकाळी व संध्याकाळी भोजनाची व्यवस्था होती. हजारो भाविकांच्या भोजनावळी उठल्या. सिंहस्थात आखाड्यांमध्ये महाप्रसादाची जशी व्यवस्था असते, तसेच चित्र या ठिकाणी दिसत होते. प्रचंड गर्दीमुळे पाथर्डी परिसरात वाहतूक कोंडी, स्वच्छतेसह अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याचा फटका आसपासच्या रहिवाश्यांना बसला. सोहळ्याचा समारोप झाल्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहतूक पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
आणखी वाचा-दुष्काळी वर्षात नाशिककरांवर पाणीपट्टीचा तिप्पट बोजा
भाविकांना झळ
श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याचा भाविकांना आनंद घेता यावा म्हणून महानगरपालिकेच्या सिटीलिंकतर्फे जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. तथापि, दिवाळी बोनस न मिळाल्याने सिटीलिंकच्या वाहकांनी अकस्मात पुकारलेल्या संपाची झळ या सोहळ्यातील भाविकांना बसली. दोन दिवस शहरातील बससेवा बंद होती. त्यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव (कार्यक्रमस्थळ) हे अंतर जवळपास दोन ते अडीच किलोमीटर आहे. तिथपर्यंत पायपीट करावी लागत होती. या काळात रिक्षाचालकांची चांदी झाली. त्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे उकळले.
आणखी वाचा-संभाजीनगरवासीय आनंदले, नाशिककर दु:खी… जायकवाडीसाठी विसर्गाला सुरुवात
वाहतूक व्यवस्था विस्कळीत
कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पाच दिवस पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव चौक, वडनेर गेट, विहितगाव आणि फेम सिग्नल ते कलानगर, पाथर्डी गाव चौक या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली होती. हजारो नागरिकांचे लोंढे, वाहने आसपासच्या रस्त्यांवरून मार्गस्थ होत असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णत विस्कळीत व्हायची. सिटीलिंक बंद असताना हजारो भाविकांना पाथर्डी फाटा ते कार्यक्रमस्थळ पायी चालावे लागले. पाथर्डी गाव परिसरातील सर्व प्रमुख लहान-मोठे रस्ते भाविक, वाहनांनी व्यापले जायचे. वाहतूक कोंडीत काही रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या.