नंदुरबार – प्रचारादरम्यान हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी केल्यामुळे आगपाखड करण्याची गरज काय, आपल्या बॅगांमध्ये काही आहे काय, असा प्रश्न करत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. निवडणूक यंत्रणेची कार्यपद्धत असून त्यांना सर्वांनी सहकार्य करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगा तपासण्यात आल्या. त्यांनी कधी असा व्हिडिओ बनवला नाही, असा टोला शिंदे यांनी हाणला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्कलकुवा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी कालिका माता मंदिरालगत असलेल्या मैदानावर खासदार शिंदे यांची सभा झाली. सभास्थळी तब्बल चार तास उशीरा पोहचलेल्या शिंदे यांनी भाषणात बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. हिना गावित यांना लक्ष्य केले. काही लोक बंडखोरी करुन उभे राहिले. ज्यांनी काम न केल्याने आपण मत न दिल्याने लोकसभा निवडणूकीत जनतेने नाकारले होते, ते आता पुन्हा मत मागण्यासाठी आले आहेत, असे म्हणत त्यांनी हिना गावित यांचे नाव न घेता टीका केली. आमश्या पाडवी यांच्या माध्यमातून सातशे कोटीचा निधी या मतदारसंघात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सव्वादोन वर्षात सरकारने बहिणींचा विचार करुन त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये टाकून त्यांना सक्षम करण्याचे काम केले. काही लोकांना ही योजना बंद करायची आहे. काही लोक न्यायालयात गेले. सरकार आले की योजना बंद करु, असे म्हणणाऱ्यांचे सरकार तुम्ही आणणार का, असा प्रश्न त्यांनी केला. संजय राऊत रोज एकच विषय मांडत असल्याने लोकदेखील त्यांना कंटाळले आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सभेला अभिनेता गोविंदा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना पाहण्यासाठी दुरवरुन आदिवासी बांधव सभेस्थळी दाखल झाल्याचे पहावयास मिळाले. मात्र ऐनवेळस गोविंदा सभेला पोहचू न शकल्याने आदिवासी बांधवांचा हिरमोड झाला

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrikant shinde criticizes uddhav thackeray over bag checking amy