नाशिक – देवळा तालुक्यातील खामखेडा येथील बुटेश्वर शिवारात डोंगरालगत असलेल्या शेततळ्यात दुपारी तीनच्या सुमारास पाय घसरून पडल्याने सख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाला. खामखेडा येथील बुटेश्वर शिवारात डोंगरालगत असलेल्या शेतात गणेश आहेर हे राहतात. त्यांची दोन्ही मुले तेजस (१२) आणि मानव (आठ) हे बुधवारी सकाळची शाळा करून घरी गेले. दुपारी शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने आईवडिलांना मदतीसाठी शेतातच होते. दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या माकडांना हुसकावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे गेले.
हेही वाचा >>> जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली होताच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना असा काही आनंद की…
माकडांना हुसकावल्यानंतर जंगलालगत असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्याचे पाणी पाहण्यासाठी थांबले. त्यावेळी मोठा भाऊ तेजसचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानवने हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला. त्यांच्याबरोबर असलेल्या चार वर्षाच्या बहिणीने शेतात पळत येत काकांना सर्व प्रकार सांगितला. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर आणि इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेततळे निम्मे भरले असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. तेजस हा खामखेडा येथील जनता विद्यालयात इयत्ता सहावीत तर, मानव हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकत होता. देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तेजस, मानव यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.