नाशिक – व्यापाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेली कांदा कोंडी दूर होण्याच्या दिशेने पावले पडत असून लासलगाव बाजार समितीच्या विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात सोमवारी लिलावाला सुरुवात झाली. दुपारी व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठक होत असून एक ते दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत होतील, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील एक हजारहून अधिक व्यापारी लिलावातून दूर झाल्यामुळे २० सप्टेंबरपासून कांदा लिलाव पूर्णत: बंद होते. या काळात शासन व प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका पार पडल्या. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने व्यापारी माघार घेण्यास तयार नव्हते. परिणामी दैनंदिन एक लाख क्विंटलचे लिलाव थांबले होते. त्यामुळे २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली. प्रशासनाने तात्पुरते परवाने देऊन व अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना लिलावात उतरवून बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते. त्या अंतर्गत लासलगाव बाजार समितीने आधी विंचूर, त्यानंतर निफाड उपबाजारात लिलाव पूर्ववत केले. विंचूर उपबाजारात चार दिवसांत सुमारे ८० हजार क्विंटलचे लिलाव होऊन त्यास सरासरी २१०० रुपये मिळाले. निफाड उपबाजारात १८०० क्विंटलचे लिलाव झाले. सरासरी दोन हजार रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – नाशिक जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत आठ संवर्गांसाठी परीक्षा
सोमवारी प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. गुरुवारपासून लासलगाव बाजार समितीत लिलाव पूर्ववत होतील. व्यापारी संघटनेशी प्राथमिक चर्चा झाली असून इतर बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत होतील, असा विश्वास मुलाणी यांनी व्यक्त केला. बहुतांश बाजार समितीत लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. पाऊस व उन्हाच्या झळांनी चाळीत कांदा खराब होऊ लागला होता. लिलाव पूर्ववत झाल्यास घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.